नेत्यांनो मयताला गावात भाषण ठोकू नका, बोर्ड लाऊन गावाने मारली नेत्याच्या मूस्काडात
प्रत्येक घटनेत प्रसिध्दीसाठी हपापलेल्या राजकीय नेत्यांना पुण्याच्या उरळी कांचन या गावाने ही अशी मुस्काडात मारलेली आहे. कोण मेलं तरी तिथे येऊन भाषण ठोकायचं,अपघातात मदत केली की फोटो टाकायचा, दहावीच्या परीक्षा असल्या तरी स्वतःचा फोटो लाऊन शुभेच्छा द्यायच्या. पी आर चे हे ओंगळवाने स्वरूप आहे. कॅलेंडरमध्ये जे जे आहे त्याच्या हे शुभेच्छा देतात. मागे एकाने थॉमस एडिसन जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या महिन्यात एका युवा नेत्याने अंगारकी संकष्टीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या कामातून आपला जनसंपर्क वाढवणे ही वेगळी बाब आहे. पण असले प्रकार वापरुन स्वतःची प्रसिद्धी करणे किळसवाणे आहे.
याला जबाबदार आपण देखील आहोत. आपल्याला नेता आपल्या कानात बोललेला फोटो गाण्यावर एडिट करुन टाकायचा असतो. गावात नेत्यांच्या वाढदिवसाला त्याच्या पायाजवळ फोटो लावून नेता माझ्याजवळ कसा आहे हे गावाला दाखवायचे असते. आपला वाढदिवस, बायकोचे डोहाळेजेवण,पोराचे बारसे, नव्या गाडीची पूजा नेत्याशिवाय होत नाही. आपल्या या मागणीतून देखील पी आर ला हे स्वरूप आलेले आहे. पूर्वी मतदारसंघातल्या समस्या जाणून घेण्यासाठी नेत्यांचे दौरे असायचे. आता लग्नभेटी, मयतभेटी, वाढदिवसभेटी असा कार्यक्रम आखला जातोय.
आपल्याला प्रत्येक गोष्टीत नेता लागतो. रेशनकार्ड काढायला नेता, मतदान कार्ड काढायला नेता, एखादा दाखला काढायला नेताच लागतो. इतकेच काय भाऊ बायकोच्या पोटात दुखतंय प्रसूती वेदना सुरू आहेत कोणत्या दवाखान्यात दाखल करू हे सुद्धा राजकीय नेत्याला विचारतात. नेत्याशिवाय आपले ‘पान’ हलत नाही. नेत्याशिवाय ही कामे होतात. हा आपला अधिकार आहे हे सुद्धा कळत नाही. जनताच अशी पंगू झाल्यावर नेते अशाप्रकारे वागणारच…..