गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, दिग्गजांची रुग्णालयात धाव
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातील दिग्गजांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी राज ठाकरे यांनी दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर दिग्दर्शक मधुर भांडारकर, सुप्रिया सुळे, आशा भोसले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाकडे धाव घेत लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपुस केली.
ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रीया केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली. तर डॉक्टरांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देतांना सांगितले की, आज दुपारी लता मंगेशकर यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात व्हेंटीलेटरवर दाखल करण्यात आले आहे. तर आता लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून त्या औषधोपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
गेल्या काही दिवसांपुर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. परंतू शनिवारी पुन्हा लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.