२१ व्या शतकात आजही महिलांना शौचालयासाठी मोर्चे, आंदोलने करावी लागत असतील तर यासारखी लाजिरवाणी बाब राज्य सरकारसाठी कोणती असू शकेल. कोल्हापूर जिल्ह्यात महिलांनी शौचालयासाठी मुक मोर्चा काढून शासनाचा निषेध केला.
दरदिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील लाखो लोक अंबाबाई मंदिरात येत असतात. मात्र अंबाबाई मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याचे प्रशासनास दरवेळी आठवण करुन दिल्यानंतरही प्रशासनाने याकडे कानडोळा केल्याचे पाहायला मिळतले. त्यानंतर आज शिवसेनेसह अनेक सामाजिक संस्था महिलांसाठी स्वच्छतागृह मंदिर परिसरात असले पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांसह महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.
अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह नसल्याने इथे येणाऱ्या महिला पर्यटकांसह स्थानिक महिलांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढला. आणि महिलांसाठी अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छ्तागृह बांधण्यात यावे, अशी मागणी सर्व महिलांनी हात जोडत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे. यामुळे श्री अंबाबाई मंदिरातील स्वच्छतागृहाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.