Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांना अटक
Alt News चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ही अटक का केली आहे? हे प्रकरण काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा
Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार कथितपणे धार्मिक भावना भडकावणे आणि धर्मामध्ये वैमनस्य वाढवण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी २०१८ ला केलेल्या ट्विटमुळे त्यांना आज अटक करण्यात आली आहे.
दरम्यान Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांनी टाइम्स नाऊ च्या कार्यक्रमात भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांचा अपमानास्पद उल्लेख केला होता. त्यानंतर जगभरात भाजप वर टीका करण्यात आली होती. मुस्लीम राष्ट्रांनी भारत सरकारच्या राजदूतांना बोलावून यावर आपत्ती नोंदवली होती. जुबैर यांच्या ट्वीट ने भारत सरकार ला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली होती. भाजपला नुपूर शर्मा यांना प्रवक्ते पदावरून निलंबीत करावे लागले होते.
अल्ट न्यूज चे संपादक प्रतिक सिन्हा यांनी आज करण्यात आलेल्या अटके संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आज मोहम्मद जुबैर यांना दुसऱ्या केस च्या चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांना अटक दुसऱ्या प्रकरणात झाली आहे. या संदर्भात प्रतिक सिन्हा यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये पोलिसांना वारंवार एफआयआर ची कॉपी मागितली तरीही एफआयआरची कॉपी देण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे.
या संदर्भात पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं असून हे प्रकरण स्पेशल पोलिस सेल मध्ये रजिष्टर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच जुबैर यांच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आज त्यांची चौकशी केली जाईल. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्ली पोलिसांना एका ट्वीटर हॅडलवरून तक्रार आली असून या ट्वीटर हॅडलच्या मते जुबैर यांनी केलेल्या एका ट्वीट मुळे एका धर्माच्या देवदेवतांचा अपमान झाला आहे. जुबैर यांनी हे ट्वीट केल्यानंतर सदर ट्वीट वारंवार रिट्वीट करण्यात आलं. हे रिट्वीट करणारी एक टीम आहे. ती शांतता भंग करण्याचं काम करते. असा आरोप या ट्वीटर युजर ने केला आहे.
दरम्यान जुबैर यांच्या अटकेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे.
ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनीही मोहम्मद जुबैर यांच्या अटकेवरून ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.