जानेवारी हा भाजप पक्षप्रवेशाचा - चंद्रशेखर बावनकुळे
राज्याच्या राजकरणात भूकंप घडण्याची शक्यता
Pune : जानेवारी हा महिना भाजपने पक्षप्रवेशासाठी दिला आहे. यामुळे येत्या काळामध्ये राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर यासंदर्भात येत्या काळात मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेण्याची जबाबदारी दिली आहे. असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
गेल्या २५ वर्षांमध्ये जे लोक आमदार झाले, खासदार झाले, किंवा निवडणुकांमध्ये पराभूत झाले असतील. अशा राजकिय पुढाऱ्यांना पक्षामध्ये घेत त्यांना सक्रिय करायला हवं. अशा प्रकारचे आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात पक्षप्रवेश होतील.
बावनकुळे यांनी पुणे लोकसभेच्या जागे संदर्भात निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीत वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर, आमदार सुनील कांबळे, माधुरी मिसाळ,सिद्धार्थ शिरोळे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी बावनकुळे बोलत होते.