जळगाव महापौर पदाची निवडणूक ऑनलाइन, न्यायालयाच्या निर्णयाने भाजपला मोठा धक्का
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदांसाठी उद्या १८ मार्चला महापौर पदाची निवडणूक होत आहे. ही निवडणूक ऑनलाईन होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने भाजपला आणखीन एक धक्का बसला आहे.
महापौर पदाची निवड ही सभागृहाताच ऑफलाईन व्हावी. यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, कोरोना आजाराच्या वाढत्या केसेस लक्षात घेता प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने महापौर, उपमहापौर निवड प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ऑनलाईन मतदान करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला मोकळी वाट निर्माण झाली आहे.
दरम्यान या निर्णयाचा फटका शिवसेनेला बसणार की भाजपला अशी चर्चा सुरु असताना या निर्णयाचा फटका भाजपला बसणार असल्याचं बोललं जात आहे.
ऑनलाईन निवड शिवसेनेच्या फायद्याची...
जळगाव महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे बंडखोर 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याने भाजपची एकहाती सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. ठाण्यात शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांच्या देखरेखीत असलेले भाजपचे फुटलेले 25 बंडखोर नगरसेवक आता ठाण्याहूनच ऑनलाईन मतदान करू शकतील.
ही निवडणूक महापालिकेत ऑफलाईन झाली असती तर भाजपने काहीतरी करिष्मा केला असता. मात्र, आता शिवसेनेच्या ताब्यात असलेले फुटीर भाजपचे नगरसेवक आता थेट ठाण्याहूनच मतदान करतील. मात्र, अजूनही भाजप काही तरी शेवटच्या क्षणाला करिष्मा करेल असं ही बोललं जातंय.
महापौरसाठी शिवसेनेच्या जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचा अर्ज-
जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेकडून जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी महापालिकेत अर्ज दाखल केला आहे.
भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी, भाजपचे 30 नगरसेवक शिवसेनेबरोबर असल्याचा दावा केला आहे.
भाजपकडून महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे आणि प्रतिभा कापसे
भाजपकडून विद्यमान महापौर भारती सोनवणे आणि प्रतिभा कापसे हे दोन उमेदवार भाजपने दिले आहेत. तसंच उपमहापौर पदासाठी आणखी एक उमेदवार दिला आहे. सदर उमेदवाराचं नाव सुरेश सोनवणे असे आहे. भाजपने दोन उमेदवार देऊन नक्की कोणती खेळी खेळली आहे? यामागे भाजपची वेगळी रणनीती आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
विशेष म्हणजे विद्यमान महापौर भारती सोनवणे यांचे पती कैलास सोनवणे हे भाजप बरोबच असून त्यांच्या गटातील 10 नगरसेवक शिवसेनेबरोबर गेले आहेत. हेच नगरसेवक महत्त्वाचे ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आणखीन काही घडामोडी पड्द्यामागून घडत आहे का? भाजपनेही आपली रणनीती आखली असून आजची रात्र महत्त्वाची मानली जात आहे.
गिरीश महाजन यांना कोरोना-
भाजपचे संकटंमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळं भाजप गोटात चिंतेचे वातावरण आहे. मात्र, महाजन हे जामनेर येथूनच यासंदर्भात सर्व सूत्र हलवत आहेत.