अर्णब गोस्वामीला तुरुंगात मोबाईल पुरवला गेल्याचे उघड, कारागृह अधीक्षक निलंबित
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आणि टीआरपी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या अर्णब गोस्वामीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.;
रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली होती. पण तुरुंगातही अर्णबला व्हीआयपी ट्रीटमेंट आणि मोबाईल पुरवण्यात आल्याचे घड झाले आहे. यामुळे अलिबाग कारागृहाचे अधीक्षक अंबादास पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खातेनिहाय चौकशीनंतर अंबादास पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच तपासात त्यांनी अर्णब गोस्वामीला मोबाईल पुरवल्याचेही स्पष्ट झाले आहे. तुरुंग महानिरीक्षकांनी ही कारवाई केली आहे. केली आहे. याआधी दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामीची तुरुंगात बडदास्त ठेवणाऱ्यांवर आता कडक कारवाई सुरू झाली आहे.
रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा यांना 4 नोव्हेबर रोजी मुंबईमधून अटक केली होती. अलिबाग न्यायालयाने तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अर्णबसह नितेश आणि फिरोज यांना अलिबाग नगर परिषद शाळा क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले होते. याठिकाणी अलिबाग जिल्हा कारागृहाचे पोलीस तैनात करण्यात आले होते.
6 नोव्हेबर रोजी अर्णब गोस्वामीला जेल पोलिसांनी मोबाईल पुरवला असल्याचे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अर्णबसह दोघांना तळोजा कारागृहात हलविण्यात आले. मात्र अर्णबला मोबाईल पुरविल्याबाबत त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार अनंत डेरे आणि जेलचे पोलीस सचिन वाडे यांच्यावर कारागृह अधीक्षक अंबादास पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक पाटील यांनीच मोबाईल आणि इतर सुविधा पुरविल्याचा आरोप केला होता.
अर्णब गोस्वामीला मोबाईल पुरवल्या प्रकरणी जिल्हा कारागृह अधीक्षक अंबादास पाटील यांचीही खातेनिहाय चौकशी सुरू झाली होती. खातेनिहाय चौकशीमध्ये पाटील यांनीच अर्णब गोस्वामी यांना मोबाईल पुरविल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.