'हे' करणारे भगतसिंह कोश्यारी पहिलेच राज्यपाल...
कॉंग्रेस च्या काळात हे झालं नाही... किंवा गेल्या 60 ते 70 वर्षात विकास झाला नाही. कॉंग्रेसने काहीच केलं नाही. असा सातत्याने आरोप करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या काळात जे आत्तापर्यंत घडलं नाही तेच घडलं आहे... वाचा राज कुलकर्णी यांचा लेख;
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेले पत्र आणि मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रास दिलेले उत्तर पाहता, कोश्यारी यांच्यावर टीका करताना अनेक विचारवंत वा पत्रकार कॉग्रेसच्या कालखंडातही राज्यपालांनी राज्य सरकारबाबत असाच वाद निर्माण केल्याचा संदर्भ देत आहेत. कोश्यारींनी केलेल्या आगाऊपणाच्या कृत्याचा विरोध करताना कॉग्रेस सत्तेत असताना झालेल्या घटनांचा उल्लेख हा अत्यंत चुकीचा व संदर्भहीन आहे. स्वत:स तटस्थ दर्शविण्याची एवढी हौस विचारवंताना का असावी, हे समजत नाही!
कॉग्रेस कालखंडातही राज्य सरकारे आणि राज्यपाल महोदय यांच्यात वाद झाले, हे मान्य करूनही कॉग्रेस च्या काळात कोणत्या राज्यपाल महोदयांनी संविधानातील धर्मनिरपेक्षतेबाबत आकस व्यक्त केला होता आणि विशिष्ट धर्माबाबत आग्रह धरून स्वत: राज्यपाल असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना संविधानातील मुलभुत तत्वांवर टीका करणारे पत्र लिहीले होते? याचे उत्तर या कथित विचारवंतांनी जरूर द्यावे!
तटस्थ असणे, निरपेक्ष असणे. याचा अर्थ असा नव्हे की, योग्य नि अयोग्य बाबीसही समान समजून त्यास स्वत:च्या तटस्थतेचे साधन करावे. स्वत:ला विचारवंत म्हणवणारे अनेक जण ही तर्कबुद्धी विसरल्याचे हे लक्षण आहे.
( राज कुलकर्णी यांच्या फेसबुक भिंतीवरून)