कोरोनाच्या संकटात महागाईचा तडका: रिझर्व बँकेचा अंदाज
कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांचा जगणं मुश्किल झालं असताना देशातील कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक आहे. ही लाट वेळीच नियंत्रणात आली नाही तर वाहतुकीवरील निर्बंध कायम राहतील. पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडेल, परिणामी देशभर महागाईचा भडका उडेल, असा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत यांच्या नेतृत्वाखालील टीमने वर्तवला आहे.;
देशात आधीच महागाई दर 5.5 टक्क्यांवर गेला आहे. त्यात आणखी वाढ झाल्यास सामान्य नागरिकांचे खायचे वांदे होणार आहेत.
आरबीआयने एप्रिल बुलेटीनच्या लेखात सध्याच्या कोरोना स्थितीबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट फार धोकादायक आहे. विषाणूचे म्युटेंट व्हेरिंएंट्स संसर्गाचा धोका वाढवत आहेत. रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्यामुळे आता स्थानिक आणि राज्य पातळीवर निर्बंध लागू केले गेले आहेत. परंतु, यामुळे आर्थिक अनिश्चितता वाढेल. पुरवठा साखळीवर परिणाम होऊन इंधन दरवाढ होईल. यातून महागाईचा भडका उडेल. दुसऱया लाटेचा कहर वाढल्यामुळे सरकारी यंत्रणांना निर्बंध लागू करणे भाग पडले आहे. त्यामुळे हॉटेल, एअरलाइन्स आणि ट्रव्हल्स इंडस्ट्रीशी संबंधित व्यवहारांना फटका बसला आहे. कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे ब्रिटनने नुकतेच हिंदुस्थानला 'ट्रव्हल बॅन लिस्ट'मध्ये टाकले आहे. याचा देशांतर्गत ट्रव्हल्स आणि टुरिझम इंडस्ट्रीला मोठा फटका बसणार आहे, असे आरबीआयच्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे.
देशात फेब्रुवारीत 5 टक्क्यांवर राहिलेला महागाई दर मार्चमध्ये 5.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्य आणि इंधन दरात मोठी वाढ झाल्यामुळे महागाई नियंत्रणाबाहेर गेली. महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या आसपास ठेवण्याचे आरबीआयचे उद्दीष्ट आहे. मात्र, कोरोना फैलाव आटोक्यात येत नसल्यामुळे हे उद्दीष्ट गाठण्याचे मोठे आव्हान आरबीआयपुढे उभे ठाकले आहे. पुढील महिनाभरात महागाई दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या कोरोना संकटामध्ये सर्वसामान्य जनतेला बँकांचे हप्ते भरण्यासाठी रिझर्व बँकेकडून काही सुटी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या कोरोना लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक जीवघेणी आणि नुकसानकारक करत असताना रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून कर्जहप्त्यांबाबत कुठलेही वक्तव्य केलं गेलेलं नाही.