स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सव'चा आरंभ; 13 प्रांतीय वेशभूषा करत गायले राष्ट्रगीत
विविध प्रकारच्या 13 भारतीय प्रांतीय वेशभूषा करत राष्ट्रगीत म्हणून कल्याण येथे 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अत्यंत जल्लोषात साजरा
कल्याण : स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सव'ला आजपासून प्रारंभ झाला आहे,यानिमित्त कल्याणमधील एका शाळेने विविध प्रकारच्या 13 भारतीय प्रांतीय वेशभूषा करत राष्ट्रगीत गायले.
12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन 'आज़ादी का अमृत महोत्सव' (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ) म्हणून साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कल्याणच्या नूतन विद्यालय शाळेतील 28 शिक्षकवृंद आणि मुख्याध्यापकांनी विविध प्रकारच्या 13 भारतीय प्रांतीय वेशभूषा करत राष्ट्रगीत म्हणून 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अत्यंत जल्लोषात आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शाळेत नसल्याने शाळेतील शिक्षकांनी हा कार्यक्रम पार पाडला. यंदाच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित नसल्याने शाळेतील शिक्षकांनी खंत व्यक्त केली. मात्र , देशाचा स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा करताना मनस्वी आनंद होत असल्याची भावना देखील नूतन विद्यालयातील शिक्षकांनी व्यक्त केली. सोबतच देशावरील हे कोरोना संकट लवकर जावं असंही त्यांनी त्यावेळी बोलताना म्हटले आहे.