जम्मू विमानतळावर हल्ला, हल्ल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग...

जम्मू विमानतळावर कोणी केला हल्ला? मोठी सुरक्षा यंत्रणा असताना कसा झाला हल्ला? तपास यंत्रणांसह हवाई दलात काय घडामोडी घडतायेत... वाचा...;

Update: 2021-06-27 06:33 GMT

जम्मू कश्मीर मधील जम्मू एअरपोर्ट वर रविवारी दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटात कोणतंही नुकसान झालेलं नसलं तरी इतक्या मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत हे स्फोट झाले कसे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या स्फोटात तांत्रीक विभागाच्या एका इमारतीचं छत कोसळलं आहे. हा हल्ला ड्रोनच्या साहाय्याने करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. तसंच एक स्फोट जमीनीवर झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या परिसरात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असल्याचं Indian Express ने वृत्तात म्हटलं आहे.

सध्या हा हल्ला कोणी केला? हे समोर आलेलं नसलं तरी या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं बोललं जात आहे.

भारतीय हवाई दलाने या संदर्भात माहिती दिली आहे. भारतीय दलाने केलेल्या ट्वीटमध्ये रविवारी सकाळी जम्मू एअर फोर्स स्टेशनमध्ये दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाले. एकामुळे इमारतीच्या छताचं नुकसान झालं असून दुसरा मोकळ्या परिसरात पडला. स्फोटात कोणतंही नुकसान झालेलं नाही. याप्रकरणी स्थानिक यंत्रणांसोबत तपास सुरु आहे.

असं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा हल्ला भारतीय वायूसेनेवर करायचा होता का? हा हल्ला म्हणजे पठानकोटप्रमाणे पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता का? दरम्यान हे प्रश्न उपस्थित होत असताना या ठिकाणी NIA ची टीम देखील दाखल झाली असून या हल्ल्याची कसून चौकशी केली जात आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील तात्काळ या घटनेनंतर हवाई दलातील अधिकारी एचएस अरोरा यांच्याशी बातचीत केली आहे. आणि परिस्थिती जाणून घेतली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू कश्मीरमधील नेत्यांची नुकतीच बैठक झाली होती. जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा निवडणूका होण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Tags:    

Similar News