राज्यातील महाविकास आघाडी सरकार दिवसेंदिवस अडचणीत येत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय संस्थांचा ससेमीरा आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत जाऊन पोचला आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर, अंबालिका शुगर, जरंडेश्वर, पुष्पदंतेश्वर शुगर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. झाडाझडती असूनही सुरु असून सविस्तर वृत्त अद्याप आलेली नाही.
गेल्या काही दिवसात सक्तवसुली संचलनालय (ED), अमलीपदार्थ विरोधी ब्युरो (NCB)आणि आयकर विभाग (IT) यांची महाराष्ट्रातील कारवाई वाढली आहे. याममधे प्रामुख्याने महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केल्याचे दिसत आहे.
आज सकाळी ठिकठिकाणी आयकर विभागाने ही कारवाई सुरु केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दौंड शुगर, अंबालिका शुगर, जरंडेश्वर, पुष्पदंतेश्वर शुगर कारखान्यांवर छापेमारी झाल्यानंतर हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे सांगण्यात येत आहेत.
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे.
आयकर विभागाने मुंबई, पुणे, नागपूरमधे एकाच वेळी धाडी टाकल्याचे वृत्त असून सत्ताधारी पक्षाच्या जवळील उद्योजक, कारखान्यांचे संचालक आणि राजकारण्यांच्या निकटवर्तींचा धाडीमधे समावेश आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याचे सांगितले जात आहे.
छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे. मी कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही म्हणायच नाही. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल, तर राज्यातील जनतेला विचार केला पाहिजे. कुठल्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो. याचा राज्यातील जनतेने विचार करावा, असे अजित पवार या कारवाईवर म्हणाले.
"माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दुख आहे, ज्यांची ३५-४० वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं." असंही अजित पवार म्हणाले आहेत.