मनातून 'जात' जात नाही आणि निघाले परिवर्तन घडवायला, सामनातून भाजपावर हल्लाबोल
उत्तरप्रदेश निवडणूकीच्या प्रचारात रंगत आली आहे. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने हाथरस प्रकरणातील पिडीतेच्या आईला उमेदवारी दिली आहे. तर योगींनी दलितांच्या घरी जेवण करून दलित समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर हल्लाबोल केला आहे.
उत्तरप्रदेश निवडणूकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर आरोप प्रत्यारोपांना रंगत आली आहे. त्यातच सर्वच पक्ष मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने हाथरस बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या आईला उमेदवारी दिली आहे. तर योगींसह भाजपात प्रवेश केलेले अभिनेते रवी किशन यांनी दलितांच्या घरी जाऊन जेवण घेतले, त्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपावर ताशेरे ओढले आहेत.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, भाजप पुढाऱ्यांना आजही दलितांकडे दलित म्हणून जेवणाचे कार्यक्रम करून त्याचा बोभाटा करावा लागतो. याता अर्थ असा आहे की, त्यांच्या मनात 'जात' आहे व ती जात घालवायची त्यांची तयारी नाही. आज संपुर्ण देशच राजकीय फायद्या-तोट्य़ासाठी जातीमध्ये वाटण्यात आला आहे. त्यामुळे जातीचे निर्मुलन थोतांड ठरले आहे. जातीस महत्व देऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री जेवणावळीचा कार्यक्रम करतात. असे म्हणत मनातून 'जात' जात नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन घडवायला, अशा शब्दात सामनातून योगींच्या जेवणावळीवर टीका करण्यात आली.
सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, योगी आदित्यनाथ यांनी दलितांच्या घरी जेवण घेतल्याची छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत. गोरखपुरचे खासदार मनोज तिवारी यांनीही यावेळी दलितांच्या घरी जेवण घेतल्याची छायाचित्रे प्रसिध्द केले. तर दलिताला दलित म्हणून हिणवण्याचा हा राजकीय प्रकार आहे का? असा सवालही भाजपाला करण्यात आला आहे. याबरोबरच पुढे हरिशंकर परसाई यांनी जगजीवन राम यांना म्हटलेल्या वाक्याचा संदर्भ दिला आहे. त्यात हरिशंकर म्हणाले होते की, "याद रहे जगजीवनराम 'उमाशंकर दीक्षित' के साथ खाना खाने से कोई सामाजिक परिवर्तन नही होगा'. त्याच प्रकारे गेल्या काही वर्षांपासून भाजप पुढाऱ्यांचा हा नवा सामाजिक परिवर्तनाचा फॉर्म्युला समोर आला आहे, असा टोला लगावला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात गंगास्नान केले, त्यानंतर काही दलितांचे पाय धुतल्याचे नाटक घडवले. त्यामुळे दलित, मजूक, सफाई कामगारांचे प्रश्न उत्तर प्रदेशात सुटले काय? असा सवाल यावेळी केला.
खास दलितांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम घडवणे म्हणजे दलितांच्या बाबतीत आपली भुमिका वेगळी आहे हे स्पष्ट करण्यासारखेच आहे. दलितांच्या घरी जेवायला जाणे, दलितांना सार्वजनिक कार्यक्रमात आमंत्रित करणे हे कार्य सगळ्यात आधी कोकणातील वास्तव्यात वीर सावरकरांनी केले, असे म्हणत सामनातून सावरकरांची आठवण सांगण्यात आली. तर पुढे असे म्हटले आहे की, एका बाजूला जातीप्रथा संपविण्यासाठी सरकारी कार्यक्रम राबवायचे आणि त्याच वेळी एखादी व्यक्ती दलित आहे. अशी दवंडी पिटवून त्याच्या घरी भोजन मेळावा घ्यायचा हे उपक्रम राबविण्यात भाजपचा हात कोणी धरणार नाही, असे सामनात म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भुमिकेचे स्मरण करत सामनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला राजकीय स्वरूप देऊन तिच्यात आमुलाग्र क्रांती घडवून आणली. तर महात्मा फुलेंनी त्यांच्या वाड्यातील विहीर दलितांसाठी खुली केली. याबरोबरच महाडला बाबासाहेबांनी जो चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यात बाबासाहेबांच्या चार पाऊले पुढे सुरबानाना टिपणीसांसारखे प्रमुख लोक होते. तर प्रबोधनकार ठाकरे यांनी अशा प्रकारच्या समाजोध्दाराच्या कामात नेहमी पुढाकार घेतला, असे मत सामनातून मांडले आहे.
अध्यात्मिकदृष्ट्या हिंदू धर्मात काही दोष आहेत. त्यातील सर्वात मोठा दोष हा चातुर्वर्ण्य हा आहे. या चातुर्वर्ण्य पध्दतीचे समर्थन संघाच्या धुरिणांनी केले म्हणूनच दलितांना वेगळे मानून त्यांच्या घरी जेवणाचे साग्रसंगित कार्यक्रम केले जातात, असा आरोप सामनातून भाजपावर लावला आहे. याबरोबरच एकाने विद्या शिकावी, दुसऱ्याने शस्र धरावे, तिसऱ्याने व्यापार आणि चौथ्याने हलक्या दर्जाची कामे करावीत ही व्यवस्था व्यक्तीच्या आत्मोन्नतीला मुळीच पोषक नाही, अशी स्पष्ट भुमिका सामनातून मांडण्यात आली आहे.
आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्य़ा मागास असलेल्या समाजघटकांचे ठीक आहे. आज सगळ्यांनाच नोकरी, शिक्षणात प्राधान्य हवे आहे. निवडणूकांतदेखील जातीची खोटी प्रमाणपत्रे वापरून लोकांची दिशाभूल केली जाते व नंतर त्यांच्या निवडणूका कोर्टाकडून रद्द केल्या जातात. अशाने समाज पुढे जाईल का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांच्यावर नाव न घेता टीका केली.
महाराष्ट्र जातीप्रथेविरोधात लढत राहिला. जोतिबा फुले यांनी 1873 मध्ये 'गुलामगिरी' या मथळ्याखाली लिहीलेल्या लेखात 'जातीभेदाचे थोतांड' हा शब्दप्रयोग केला होता. 1818 साली पेशवाई बरखास्त झाली. पेशवाईत जातीभेदासंबंधीचे सर्व दुष्ट प्रकार अस्तित्वात होते. त्या स्थितीवर लोकहितवाद्यांनी प्रहार केले. त्यानंतर न्यायमुर्ती. महादेव गोविंद रानडे यांनी तोच विचार पुढे नेला. लोकमान्य टिळकांनी राजकीय सुधारणांवर भर दिला तर आगरकरांनी सामाजिक सुधारणांना अग्रहक्क देण्याबाबत विचार मांडला. आगरकर म्हणतात, "जातीमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातीमुळे ज्ञान, कला, शास्र वैगेरे तिथल्या तेथे कोंडल्यासारखी झाली आहेत. जातीमुंळे सर्व आचारात व विचारात मतभेद निर्माण होऊन ती परस्पर वैरास, छळास मत्सरास कारण ठरली आहे. तर जातींमुळे अन्न-व्यवहार-विवाह वगैरेंच्या संबंधात गैरसोय झाली आहे. जातीभेदांमुळे आमची भुतदया, आमचे बंधुप्रेम आमची उदारता, आमची धर्मबुध्दी. आमची परोपकार वृत्ती, आमचे विचार यांचे क्षेत्र कितीतरी मर्यादित झाले आहे, याची कल्पना लोकांना येत नाही." असे म्हणत आगरकरांच्या मताचा संदर्भ दिला आहे.
पुढे अग्रलेखाच्या उत्तरार्धात म्हटले आहे की, आगरकरांनी हे सांगून दशके लोटली आहेत, पण आज परिस्थिती काय आहे? आजही मतदार संघामध्ये जातीची गणिते पाहून उमेदवाऱ्या दिल्या जातात. जातीस महत्व देऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री जेवणावळीचे कार्यक्रम करतात. मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन घडवायला, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला लगावला.