नांदेड जिल्ह्यात आहे 'बिनभोंग्याचे गाव'
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापले आहे. मात्र या भोंग्यांच्या गर्दीत बिनभोंग्याचे गाव म्हणून नांदेड जिल्ह्यातील बारड हे गाव चर्चेत आले आहे.;
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे आव्हान दिले होते. तर मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर अजान सुरू असताना मशिदीसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. मात्र राज ठाकरे यांनी झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी उत्तर सभेचे आयोजन केले होते. त्यामध्येही 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे आव्हान दिले आहे. मात्र या भोंग्यांच्या गदारोळात नांदेड जिल्ह्यातील बारड या गावात एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नसल्याने हे गाव राज्याच चर्चेचा विषय ठरत आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यातील सामाजिक ऐक्याला तडा जाईल, अशी शक्यता निर्माण झाल्याची चर्चा होती. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील बारड या गावात एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नसल्याचे समोर आल्याने एकच आशादायी चित्र निर्माण झाले आहे. कारण भोंग्यांवरून राजकारण तापले असताना या गावातील सर्व धार्मिक स्थळावरून भोंगे काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात बारड या गावची चर्चा रंगली आहे.
धार्मिक स्थळे किती?
बारड या गावात 8 मंदिरं, 1 मशिद, 2 बौध्द विहार आणि 1 जैन मंदिर आहे. मात्र या सर्व धार्मिक स्थळांवरून भोंगे काढून टाकले असल्याने राज्यभरातून या गावावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.
बारड गावचा अनोखा निर्णय
राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापले असताना नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या बारड या गावाने एक महत्वाचा निर्णय घेतला. बारड गावाने गावात ध्वनिप्रदुषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, गावातील विद्यार्थ्यांना या आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी गावातील सर्वच धार्मिक स्थळावरून भोंगे काढण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला. त्यामुळे या कौतुकास्पद निर्णयाने राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे.
बारड या गावात लोक कटाक्षाने ध्वनीप्रदुषण टाळतात. लग्नसमारंभ असो वा इतर कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम ध्वनिप्रदुषण होऊ नये याची दखल गावकरी घेतात. त्यामुळे या गावाचा आदर्श राज्यातील सर्वच गावांनी घेण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.