मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर काळे झेंडे दाखवणार , शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांना निवेदन
कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, फी यावरून शिक्षण संस्थांकडून लावण्यात येणाऱ्या तगाद्याविरोधात गेल्या काही दिवसापासून एमआयएमची विद्यार्थी आघाडी कमालीची आक्रमक झाली आहे.;
कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, फी यावरून शिक्षण संस्थांकडून लावण्यात येणाऱ्या तगाद्याविरोधात गेल्या काही दिवसापासून एमआयएमची विद्यार्थी आघाडी कमालीची आक्रमक झाली आहे. विद्यार्थी आघाडीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मान्य न केल्यास राज्यभर काळे झेंडे दाखवत सरकारविरोधात काळे झेंडे दाखविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
एमआयएमच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी खांदा कॉलनीतील डीएव्ही शाळा, नेरूळची सेंट झेविअर्स शाळा, ऐरोलीतीलही सेंट झेविअर्स शाळा येथे धडक देत विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गेल्या काही दिवसात तेथील शालेय व्यवस्थापनाशी चर्चा करत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.
काही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च हाजी शाहनवाझ खान यांनी स्वत: तर काही विद्यार्थ्यांचा खर्च सामाजिक संस्थांना उचलण्यास सांगितले आहे. शालेय समस्यांबाबत चर्चा करताना कोरोना महामारीमुळे पालकांच्या आर्थिक अडचणी समजावून घ्या, फीच्या नावाखाली अन्य भुर्दंड लादू नका अन्यथा आम्हाला शाळेच्या विरोधात पालकांसमवेत आंदोलन करावे लागेल असेही हाजी शाहनवाझ खान यांनी चर्चेदरम्यान ठणकावून सांगितले आहे. हाजी शाहनवाझ खान यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील आक्रमकतेमुळे नवी मुंबईसह पनवेल, उरण भागातील पालक शैक्षणिक समस्या घेवुन हाजी शाहनवाझ खान यांच्या भेट घेत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात राज्यातील शैक्षणिक संस्था फी व अन्य शुल्काच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांना देत असलेल्या त्रासाबाबत एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. कुणाल खरात, महासचिव हाजी शाहनवाझ खान व अन्य पदाधिकाऱ्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची भेट घेत त्यांना सर्वांनी घेराव घातला. पहिली ते बारावीपर्यतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण हे मोफत मिळालेच पाहिजे तसेच शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिलेले शुल्कच घेण्यास भाग पाडावे यासह अन्य शैक्षणिक समस्या मांडत सर्व शालेय समस्यांबाबतचे निवेदन डॉ. कुणाल खरात व हाजी शाहनवाझ खान यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना सादर केले.
कोरोना महामारीमुळे जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागत असतानाच शैक्षणिक शुल्काच्या नावाखाली शैक्षणिक संस्थांकडून होत असलेली पिळवणूक थांबवावी अन्यथा पालक वर्गाचा संयम सुटल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती हाजी शाहनवाझ खान यांनी चर्चेदरम्यान बोलूनही दाखविली. राज्य सरकारने या मागण्या मान्य न केल्यास विद्यार्थी व पालकांवर होत असलेल्या अन्यायाकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर काळे झेंडे दाखवित सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. कुणाल खरात व हाजी शाहनवाझ खान यांनी यावेळी दिला.