बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून कसोटी, कॉपीमुक्तीसाठी सरकारने उचललं मोठं पाऊल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून (HSC) परीक्षा आजपासून सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारने कॉपीमुक्तीसाठी मोठं पाऊल उचललं आहे.;
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा (HSC Board) मंडळाच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. या परीक्षांसाठी राज्यभरातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर हा आकडा गेल्या पाच वर्षातील सर्वात जास्त आहे. त्यामुळे परीक्षा सुरु होण्यापुर्वी विद्यार्थ्यांनी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोहचणे आवश्यक आहे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान राज्यातील 3 हजार 195 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहेत. यामध्ये 6 लाख 64 हजार 441 विद्यार्थीनींसह 7 लाख 92 हजार 780 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 6 हजार 516 दिव्यांग तर 72 तृतियपंथी विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
बारावीच्या परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
परीक्षेचे बदलले नियम (Instruction For 12 th Student)
परीक्षेपुर्वी 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्यात येत होती. मात्र फेब्रुवारी -मार्च 2023 पासून हा नियम रद्द करण्यात आला आहे. मात्र प्रत्येक पेपरला सुरुवातीचे दहा मिनिटे शेवटी जोडून देण्यात आले आहेत.
परीक्षेसाठीचे नियम
- परीक्षा केंद्रावर प्रवेश करतांना विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार
- परीक्षा केंद्रात रायटिंग पॅड आणि लेखन साहित्य नेण्याची परवानगी आहे
- परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना परीक्षा कक्ष सोडून बाहेर जाता येणार नाही.