2024 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकीची वज्रमूठ आवळली आहे. दरम्यान ‘आप’ने बैठकीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे.
भाजपविरोधात (BJP) महाआघाडी करण्यासाठी पाटणा येथे शक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भाजपला शह देण्याची रणनिती आखण्यात येणार आहे. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या पाटणा (Patna) येथील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मात्र त्यापुर्वीच विरोधी आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने केंद्र सरकारच्या वटहुकूमाविरोधात काँग्रेसने पाठींबा दिला नाही तर या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. मात्र नितीशकुमार यांच्याकडून ‘आप’ची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
महाआघाडीच्या बैठकीत लोकसभा 2024 (Loksabha Election 2024) साठीची रणनिती आखण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजपविरोधात एकास एक उमेदवार देण्यात यावा, अशी चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर एकास एक उमेदवार देण्याच्या सूत्रावर मान्यतेसह सविस्तर चर्चा घडवून आणणे आणि सर्वांची सहमती मिळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
याबरोबरच भाजपच्या प्रखर हिंदूत्वाच्या मुद्द्याला शह देण्यासाठी महाआघाडीकडून जातनिहाय जनगणना (Castwise censes) हा लोकसभा निवडणूकीतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवण्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे पाटण्यातील बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
या बैठकीत नेमकं कोण असणार?
नितीश कुमार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत देशभरातील 20 भाजपविरोधी पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, के सी वेणूगोपाल, जयराम रमेश, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, राष्ट्रीय जनता दलचे तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, माकपचे सिताराम येचूरी, भाकपचे महासचिव डी राजा हे उपस्थित राहणार आहेत.
विरोधी पक्षातील के सी आर, बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक यांना निमंत्रण दिले आहे. मात्र ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्याबरोबरच राष्ट्रीय लोकदलचे जयंत चौधरी हे आपल्या पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीला उपस्थि राहू शकणार नाहीत.