सिरम इन्स्टिट्युटचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी पुण्यात पत्रकार परीषद घेतली. त्यावेळी त्यांनी कोव्हिडची लस कधीपर्यंत घ्यावी लागेल याबाबत माहिती दिली. शिवाय कोव्हिशील्डचे दोन डोस घेतलेल्यांनी तिसरा बुस्टर डोस घ्यायलाच हवा असे आवाहन केले. याशिवाय त्यांनी इतर अनेक विषयांवर भाष्य केले.
कोव्हिडमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचा आर्थिक गाडा हाकणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये आतपर्यंत सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभुमीवर पुण्यातच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणारी कोव्हिशिल्ड लस आधी पुणे शहरात द्यावी अशी मागणी अनेक स्तरातुन करण्यात आली होती. परंतू या मागणीवर अजुनही काहीही ठोस निर्णय झालेला नाही. याविषयी एक मोठा खुलासा शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी केला आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण असल्याचं अहवालामध्ये दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणा केली होती, अशी माहिती सायरस पूनावाला यांनी दिली आहे.
"जोपर्यंत जगभरात कोव्हीड समुळ नष्ट होत नाही तोपर्यंत रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होत राहण्यासाठी सतत लस घ्यावी लागणार आहे. तसेच बऱ्याच लोकांचे लसीकरण पुर्ण झालेले असल्याने दुसरी लाट जितकी गंभीर होती तितकी तिसरी लाट गंभीर असणार नाही", असं देखील सायरस पुनावाला यावेळी म्हणाले.
याशिवाय त्यांनी इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर देखील आपले मौन सोडले. त्यांनी थेट राजकारण्यांवर टीका करत "राजकारणी थापा मारतात. महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणे सिरमला सक्य नाही. लसीच्या किंमतीत बदल झाल्याने सीरमला मोठ्या प्रमाणात तोटा झाला परंतू भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केला.
कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील एन्टीबॉडीज कमी होतात असा रिपोर्ट लॅन्सेट मध्ये छापून आला आहे. जे खरे आहे. त्यामुळे कोव्हीशिल्ड लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी तिसरा बुस्टर डोस घ्यायलाच हवा. मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतलाय.
मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालुन अतिशय वाईट गोष्ट केली आहे. माझा मुलगा मला म्हणाला की यावर तोंड उघडू नका पण मी यावर बोलणार आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील एकशे सत्तर देशांना लस पुरवते. पण आता गरज असताना त्यांना लस देता येत नाही.
याशिवाय दोन वेगवेगळ्या लसींचे कॉकटेल डोस घेणे ही वाईट कल्पना आहे. लसींच्या कॉकटेलमुळे योग्य परिणाम मिळतील असे ठामपणे सांगता येणार नाही.", असे सांगत टीका केली.
तसेच नोवावॅक्स लस कधी येणार याबद्दलही त्यांनी यावेळी सांगितले. "जोपर्यंत आम्हाला नोव्हावॅक्स लाँच करण्याचा परवाना मिळत नाही तोपर्यंत आम्ही ती लॉन्च करू शकत नाही. मूळ अमेरिकन कंपनीला यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) सोबत काही समस्या आहेत, त्या ऑक्टोबर अखेरीस दूर व्हायला पाहिजेत", असे देखील सायरस पूनावाला म्हणाले.