आदिवासी महिलांकडून पारदर्शक साड्यांची होळी; नवनीत राणांना सुनावले खडेबोल

Update: 2024-03-24 14:38 GMT

मागील काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनित राणा यांनी आपल्या मतदारसंघात होळी महोत्सवानिमित्त आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप केले होते. त्यावेळी आदिवासी महिलांकडून या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला होता. नवनित राणा, तु्म्ही आम्हाला ज्या पध्दतीच्या साड्या भेट म्हणून दिलात ती भेट नसुन आमच्या अब्रुची इज्जत काढण्याचा जाणीवपूर्वक केलेला हा खोडसाळपणा आहे. अशा शब्दांत त्यावेळी या आदिवासी महिलांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. आता होळीच्या सणानिमित्त नवनित राणांनी दिलेल्या याच साड्या आदिवासी महिलांनी होळीच्या अग्नीत पेटवत नवनित राणा यांच्या तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

आदिवासी महिलांनी साड्यांची केली होळी

नवनित राणांकडून आदिवासी महिलांना देण्यात आलेल्या या साड्या होळीच्या अग्नीमध्ये पेटवत महिला नवनित राणांना म्हणाल्या की, आम्ही आदिवासी आहोत म्हणून काहीही परिधान करू असं वाटलं काय तुम्हाला? या आदिवासी महिला आता पूर्वीसारख्या आडाणी राहिल्या नाहीत, आता आम्ही सुज्ञ आणि सजग झालो आहोत. आमच्या मतावर राज्य करून इतके दिवस सत्ता उपभोगलात, पण आता यानंतर या मेळघाटमध्ये तुम्ही मत मागायला अजिबात येऊ नका. आणि पुन्हा नव्याने सत्तेत यायचं स्वप्न विसरून जा, अशा तिव्र शब्दात या महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, होळीच्या अग्नीत साड्या पेटवत महिला असंही म्हणाल्या की, तुम्ही पोस्टवर ज्या पध्दतीच्या सुंदर-सुंदर साड्या छापल्या त्या पध्दतीच्या साड्या आम्हाला न देता भलत्याच साड्या देत आहात. आम्हाला दिलेली साडी तुम्ही स्वतः घालून आमच्यामध्ये फिरू शकता का ? एवढी हिम्मत आहे ? असं आव्हान यावेळी आदिवासी महिला समूहाकडून नवनित राणांना करण्यात आलं.

Tags:    

Similar News