हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत सकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. तर ठाण्यातही पहाटेपासून पाऊस सुरू आहे. मुंबईसह कोकणात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मुंबईतल्या सर्व भागात सकाळपासून पाऊस कोसळतोय. पण लोकल सेवा सध्या तरी सुरळीत आहे. मुंबईसह कोकणात ९ ते १२ जून या काळात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईत रस्त्यांवर पाणी साचू लागले आहे. काही वेळ पावसाचा जोर कायम राहिला तर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, वसई, विरार इथेही जोरदार पाऊस होतो आहे. कोरोनामुळे लोकल प्रवासावर निर्बंध असल्याने अनेकांना खासगी वाहनांनीच ऑफिसला जावे लागते आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.