मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पेपरफुटी प्रकरणावरून विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पेपरफुटीप्रकरणी सरकारला अनेक सवाल विचारले, या सर्व प्रश्नांची उत्तरं देत माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असल्याचा आरोप केला. तर न्यासा कंपनीच्या दलालाची परीक्षेसंबंधी व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप खरी आहे का? त्याची सरकारने चौकशी केली आहे का? त्यात गट क साठी 15 लाख रूपये आणि ड गटासाठी 8 लाख रूपये हे त्या दलालाने सांगितले आहेत. त्याची तुम्ही चौकशी केली आहे का? आणि जर परीक्षेच्या बाबतीत ते घडलं असेल तर तुम्ही काय निर्णय घेणार आहात? , असे सवाल उपस्थित केले. या प्रकरणात अटक झालेल्या महेश बोटलेचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहचत असतील तर त्याची निष्पक्षपणे चौकशी होईल का, असे सवाल सरकारला विचारले.
या प्रश्नांवर उत्तर देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सायबर पोलिस तपास करत आहेत, तसेच माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे टोपे यांनी सांगितले. दलालाच्या ऑडिओ क्लिप आणि 200 उमेदवारांनी पैसे दिल्याच्या आरोप प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत. तसेच आरोग्य विभागाने या प्रकरणात स्वतः एफआयआर केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. परीक्षांच्या आयोजनात गोंधळ झाल्याची कबुली आरोग्यमंत्र्यांनी दिली, पण कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण भरती व्हावी असा सरळ हेतू सरकारचा होता, पण त्यात कुणी गैरप्रकार केला असेल तर कडक शिक्षा होईल असेही आश्वासन टोपे यांनी दिले.
पण न्यासा कंपनीची 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची क्षमता नसताना सरकारने निकष कमी का केले? तसेच न्यासा कंपनीनेच परीक्षा घ्याव्यात हा आग्रह का धरला? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, न्यासा कंपनीची निवड पुर्ण प्रक्रीयेनुसार पारदर्शक पध्दतीनेच करण्यात आली. हायकोर्टाने या कंपनीची स्थिती तपासून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे न्यासा कंपनीची प्रक्रियेनंतर निवड करण्यात आली असे त्यांनी सांगितले.
उमेदवारांची पुन्हा परीक्षा घ्यायची की, या परीक्षेतील 10 टक्के लोकांना घेऊन पुन्हा पात्रता परीक्षा घ्यायची किंवा पूर्ण परीक्षा रद्द करून पुन्हा नवीन पद्धतीने परीक्षा घ्यायची यावर विचारपूर्वक निर्णय़ घेतला जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच पुन्हा परीक्षा घ्यायची गरज भासली तरी त्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याकडून पुन्हा परीक्षा फी घेतली जाणार नाही आरोग्यविभाग फी भरेल, अशी घोषणाही राजेश टोपे यांनी केली.