RSS ला तिरंग्याचं वावडं आहे का?
मोदी सरकारच्या आवाहनानंतर सोशल मीडियावरही हर घर तिरंगा अभियान गाजत आहे. मात्र याला RSS ने ठेंगा दिल्याची चर्चा रंगली आहे.
मोदी सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र भाजपची मातृसंस्था असलेल्या RSS ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवाहनाला प्रतिसाद दिला नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आरएसएसला तिरंग्याचं वावडं आहे का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यामुळे देशाच्या आझादी के अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मोदी सरकारने हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले होते. तसेच सरकारने सोशल मीडियाचा प्रोफाईल फोटोही तिरंगा ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याला देशभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. तर भाजपच्या नेत्यांनीही आपल्या सोशल मीडियाचा प्रोफाईल फोटो बदलून तिरंगा ठेवल्याचे दिसत आहे. मात्र भाजपची मातृसंस्था असलेल्या RSS च्या ट्वीटर हँडल आणि फेसबुकवर भगवा ध्वजाचे प्रोफाईल फोटो ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या आवाहनाला RSS ने ठेंगा दिल्याची चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान देशातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र 13 ऑगस्टपुर्वीच देशातील नागरिकांनी या आपल्या सोशल मीडियाचे प्रोफाईल बदलवण्यास सुरूवात केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या सोशल मीडियाचे प्रोफाईल बदलले आहे. त्यापाठोपाठ देशातील नागरिकांनीही आपल्या सोशल मीडियाचा प्रोफाईलफोटो बदलून तिरंगा ठेवण्यास सुरूवात केली आहे.
मोदी सरकारने केलेल्या आवाहनानंतर काँग्रेस नेत्यांनीही या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पंडित नेहरू यांनी तिरंग्याचे अनावरण करतानाचा फोटो आपल्या प्रोफाईलला ठेवला आहे.
भाजपच्या नेत्यांनीही मोदी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा प्रोफाईल बदलून तिरंगा ठेवला आहे.
भाजपच्या अधिकृत खात्याचाही प्रोफाईल बदलण्यात आला आहे.
मात्र भाजप नेते असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केल्यानंतरही भाजपची मातृसंस्था असलेल्या RSS ने आपल्या सोशल मीडियाचा डीपी बदलला नसल्याचे चित्र आहे.
अल्ट न्यूजचे मोहम्मद जुबैर यांनीही RSS चे सरसंघचालक मोहन भागवत, सुरेश सोनी, दत्तात्रय होसबळे, अरुण कुमार, अनिरुध्द देशपांडे, व्ही भाग्येश, क्रिष्णा गोपाल, नरेंदर कुमार यांनी आपल्या सोशल मीडियाचा कव्हर फोटो हा RSS चाच कायम ठेवला असल्याचा आणि आपला प्रोफाईल फोटो स्वतःचाच ठेवल्याचा फोटो ट्वीट केला आहे.
Sorry? pic.twitter.com/e1MPrIyy59
— Mohammed Zubair (@zoo_bear) August 3, 2022
मॅक्स महाराष्ट्रने यासंदर्भात RSS चे ट्वीटर हँडल आणि फेसबुक पेजवर माहिती जाणून घेतली असता त्या ठिकाणी RSS ने आपला डीपी बदलला नसून तो भगवा ध्वजच कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरएसएसला तिरंग्याचं वावडं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.