राज्यपाल गो बॅक..! काँग्रेस
राज्यातील काँग्रेस पक्ष राज्यपालांविरोधात आक्रमक झाला आहे. तर माजी मंत्री काँग्रेस प्रदेशचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी राज्यपाल गो बॅक म्हणत केंद्राने राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी केली आहे.;
मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यपाल आणि सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यातच राज्य विधिमंडळाने विधानसभा अध्यक्षपदासाठी पाठवलेला प्रस्ताव राज्यपालांनी घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत परत पाठवला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस पक्ष राज्यपालांविरोधात आक्रमक झाला आहे. तर माजी मंत्री काँग्रेस प्रदेशचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी राज्यपाल गो बॅक म्हणत केंद्राने राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी आणि राज्य सरकारमध्ये विधानपरिषदेच्या 12 जागांवरून संघर्ष सुरू आहे. त्यातच विधानसभाध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला आहे. त्यामुळे राज्यपाल भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला. तर राज्यपाल भाजपा नेत्यांच्या नादी लागून सरकारला अडथळा निर्माण करत आहेत. तर राज्यपालांचे पद हे घटनात्मक असल्याने राज्यपालांनी घटनात्मक चौकटीत राहुन निर्णय घ्यायला हवेत, असेही नसीन खान म्हटले.
विधानसभा अध्यक्षपद हे 11 महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या पदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याबाबत राज्यपालांकडे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्या प्रस्तावावर सही करून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घ्यायला परवानगी द्यायला हवी होती. परंतू राज्यपालांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करत सरकारच्या निर्णयाला आडकाठी घातली. राज्यपाल लोकनियुक्त सरकारच्या निर्णयांना न जुमानता घटनात्मक सबबी सांगून राज्य सरकारला अडचणी निर्माण करत आहेत. तर राज्यपाल एकाच पक्षाचे असल्यासारखे वर्तन करत आहेत. विरोधी पक्ष भाजपाकडून प्रत्येक घटनेत राज्यपालांचा वापर केला जातो. तर राज्यपाल राज्यात समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र राज्यपाल त्यांच्यावर दबाब असल्याचे सांगतात. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदाच्या जबाबदारीतुन मुक्त करावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.