चंद्रकांत पाटील यांची पु्न्हा तारीख, सात मार्चला मविआ सरकार पडणार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडण्याची तारीख दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सरकार संघर्ष पेटला आहे. त्यातच भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याच्या तारखा जाहीर करत आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत नवी भविष्यवाणी केली आहे.उत्तर प्रदेशमध्ये सात मार्चला विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं की राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.मंगळवारी कोल्हापूर येथे पत्रकाराशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो.
यावेळी चंद्रकांत पाटलांना दिशा सलियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील. दूध का दूध, पानी का पानी होईल. कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल? हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.
चंद्रकांत पाटलांनी सरकारच्या ऊस एफआरपी धोरणावरही टीका केली. महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.