ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजीत डिसले यांचे योगदान काय? शिक्षण विभागाकडून चौकशीला सुरूवात

Update: 2022-01-22 08:23 GMT

सोलापूर - 'ग्लोबल टीचर पुरस्कार' मिळवणाऱ्या रणजीत डिसले गुरुजींमुळे जगात देशाची मान अभिमानाने उंचावली, पण आता रणजीत डिसले गुरुजी येत्या दोन ते तीन दिवसांत नोकरीचा राजीनामा देण्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत, त्यांनीच माध्यमांना तशी माहिती दिली आहे. ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या कामाचा आदर केला जातं नाही अशा ठिकाणी काम करण्याच्या मानसिकतेत आपण सध्या नाहीये, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. डिसले गुरुजींनी अमेरिकेत संशोधन शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. त्यासाठी त्यांनी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांची रजा मागितली होती. पण त्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, असे सांगत सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नकार दिला होता. त्यानंतर आपली अडवणूक केली जात असल्याचे सांगत रणजीत डिसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जि.प.च्या शिक्षण विभागाचे म्हणणे काय?

पण रणजीत डिसले यांच्या या तक्रारीवर सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आपली प्रतिक्रिया देत, त्यांचे आरोप खोडून काढले आहेत. राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, असे लोहार यांनी म्हटले आहे. "रणजीत डिसले यांनी रजेसाठी फक्त अर्ज केला आहे, त्यासोबतची कागदपत्रे नव्हती आणि परवानगीसाठी ते थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले, योग्य प्रस्ताव आल्यास रजा द्यायला काही अडचण नाही" असे लोहार यांनी स्पष्ट केले आहे. पण योग्य कागदपत्रे जोडायची नाहीत आणि रजा मंजूर झाली नाही म्हणायचं याला अर्थ नाही, अशी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

रणजीत डिसले यांच्यावर आरोप काय?

दरम्यान रणजीत डिसले यांनी जागतिक पातळीवर पुरस्कार मिळवला असला तरी ज्या शाळेत ते प्रतिनियुक्तीवर होते, त्या शाळेत ते ३ वर्ष हजरच राहिले नाहीत, असा अहवाल चौकशी समितीने दिल्याची माहितीही किरण लोहार यांनी दिली आहे. या समितीमध्ये ५ सदस्य होते. " चौकशीमध्ये जी काही माहिती समोर आली आहे ती आम्ही प्रशासनासमोर मांडली आहे, आता जिल्हा परिषद प्रशासन योग्य निर्णय घेईल" अशी माहितीही त्यांनी दिली. पण आपल्यावर टीका होते म्हणून आपण रजा मंजूर करावी असे होणार नाही, असेही लोहार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान डिसले गुरूजींच्या दीर्घ रजेमुळे त्यांच्या शिकवणाच्या कामावर होणाऱ्या परिणामाचे कारण देण्यात आले आहे. तसेच अशा अवांतर उपक्रमांमधून डिसले गुरूजींची नियुक्ती झालेल्या परितेवाडी शाळेत काय बदल झाला याची चौकशी करण्याचा निर्णय जि.प, शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच गेल्या तीन वर्षांत गणजीत डिसले यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तसेच ते काम करत असलेल्या परितेवाडी शाळेसाठी काय योगदान दिले हे तपासायचे असल्याचे सांगून त्यांची सर्विस फाईल फाइल शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी मागवली आहे. रणजीत डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळणं ही अभिमानीची बाब आहे, पण त्यांच्या या कार्याचा परितेवाडी शालेला काय उपयोग झाला हे तपासावे लागेल, असे किरण लोहार यांचे म्हणणे आहे.

Tags:    

Similar News