मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच आणि साक्षीदार किरण गोसावी याची अटक अटळ आहे. किरण गोसावी ( kiran gosavi ) हा महाराष्ट्राबाहेर आहे. तो उत्तर प्रदेशात असल्याचं सांगण्यात येतंय. आता किरण गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात 'आपल्याला सरेंडर करायचं आहे', असं किरण गोसावी लखनऊ पोलिसांना म्हणतोय. तर पोलिस अधिकारी त्याला सरेंडर करून घेण्यास स्पष्टपणे नकार देत आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये 'मी किरण गोसावी बोलतोय आणि आपल्याला पोलीस ठाण्यात सरेंडर करायचं आहे', असं किरण गोसावी लखनऊतील पोलिस अधिकाऱ्याला म्हणतो. त्यावर पोलीस अधिकारी त्याला विचारतात 'इथेच का सरेंडर करायचं आहे?' . आपल्याला येथील पोलीस स्टेशन जवळ आहे, यामुळे सरेंडर करायचं आहे, असं गोसावी त्या अधिकाऱ्याला सांगतो. तर इथे सरेंडर करून घेणार नाही, दुसरीकडे जा, असं सांगत पोलीस अधिकारी किरण गोसावीला नकार देताना ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतं आहे.
दरम्यान, किरण गोसावी हा लखनऊमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक लखनऊला रवाना झाले आहे. गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी NCB ने अटक केली आहे. या प्रकरणी आर्यन खान हा तुरुंगात आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी गोसावीने शाहरुख खानची मॅनेजर पूजाशी कोट्यवधींची डील केल्याचा आरोप प्रभाकर साईल याने केला आहे. गोसावीची २५ कोटींची डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असाही आरोप साईलने केला आहे. या आरोपांनंतर किरण गोसावी महाराष्ट्राबाहेर आहे. आर्यन खानसोबतचे किरण गोसावीचा फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, आर्यनच्या सांगण्यावरूनच आपण शाहरुखच्या मॅनेजरला फोन लावला होता, असं किरण गोसावीचं म्हणणं आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव आहे. मलेशियात नोकरी लावतो म्हणून पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी 3 लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी २०१८ मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.