इंधनदरवाढ हे वित्त मंत्रालयाचे वैचारीक दारीद्र्य आणि देशद्रोह : भाजपा खासदाराचा घरचा आहेर

रोजच्या इंधनदरवाढीने सर्वसामान्य जनता बेजार झाली असताना महागाईविरोधात आता सत्तेतील भाजपा सरकारमधील खासदारानेच शंख फुंकले आहे. रोजच्या रोज होणारी इंधनदरवाढही अर्थमंत्रालयाच्या वैचारिक दारिद्रयाचा परिणाम असून हा एक प्रकारचा देशद्रोहच असल्याची खरमरीत टिका करत भाजपा खासदारानेच मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Update: 2022-04-05 05:00 GMT

रोजच्या इंधनदरवाढीने सर्वसामान्य जनता बेजार झाली असताना महागाईविरोधात आता सत्तेतील भाजपा सरकारमधील खासदारानेच  शंख फुंकले आहे. रोजच्या रोज होणारी इंधनदरवाढही अर्थमंत्रालयाच्या वैचारिक दारिद्रयाचा परिणाम असून हा एक प्रकारचा देशद्रोहच असल्याची खरमरीत टिका करत भाजपा खासदारानेच मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील 15 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून, आतापर्यंतची ही वाढ 9.20 रुपयांवर गेली आहे

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका होत आहे. इंधनदरवाढीच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सुब्रमण्यम स्वामी यांनी निशाणा साधलाय. अर्थसंकल्पामधील वित्तीय तूट अर्थमंत्रालय इंधनदरवाढ करुन भरुन काढत असल्याचा दावा करत स्वामी यांनी हे असं करणं म्हणजे आर्थिक परिस्थिती हाताळण्याची क्षमता नसल्याचं लक्षण असल्याचा टोला लगावला आहे.

स्वामी यांनी ट्विटरवरुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याअंतर्गत येणाऱ्या अर्थमंत्रालयावर थेट शब्दांमध्ये ट्विटरवरुन निशाणा साधलाय. स्वामी यांनी ट्विटरवरुन इंधनदरवाढीमुळे देशामध्ये अराजक माजेल अशी भीती व्यक्त केलीय. "रोज पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे देशात उठाव निर्माण होण्यासारखी परिस्थिती तयार होत आहे," असं स्वामी म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अर्थमंत्रालय जबाबदार असून त्यांच्या वैचारिक दारिद्रयामुळेच हे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. "असं करणं हे अर्थमंत्रालयाचं वैचारिक दारिद्रय आहे. तसेच हा देशद्रोह आहे," असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे "अर्थसंकल्पातील तूट ही अशापद्धतीने दरवाढ करुन भरुन काढणे हे आर्थिक परिस्थिती हाताळण्याची क्षमता नसल्याचं लक्षण आहे," असा टोला स्वामींनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रशियाकडून स्वस्तात मिळणारं कच्च तेल घेण्यास पाठिंबा दर्शवला होता. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह मित्रराष्ट्रांनी रशियावर मोठे आर्थिक निर्बंध लादले. रशियाच्या कच्चा तेलाची खरेदीही थांबवण्यात आली. या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले. याच पार्श्वभूमीवर बोलताना निर्मला यांनी, "माझ्यासाठी देशाची उर्जा सुरक्षा पहिल्या प्राधान्यावर आहे. जर सवलतीच्या दरात इंधन मिळत असेल तर आम्ही ते का खरेदी करू नये? आम्ही रशियाकडून इंधन खरेदीला सुरुवात केली आहे. आम्हाला भरपूर प्रमाणात तेल मिळाले आहे," असं म्हटलं होतं.


पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

Tags:    

Similar News