गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा बंडाचा झेंडा, बंडाळी रोखणे भाजपासमोरचे आव्हान

पाच राज्यातील निवडणूकीचे वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. तर गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्यापाठोपाठ गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे बंडाळी रोखणे हे भाजपसमोरचे मोठे आव्हान असणार आहे.;

Update: 2022-01-22 06:29 GMT

गोवा निवडणूकीत रंगत यायला सुरूवात झाली आहे. त्यातच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना पणजीतून भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तर पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांनी आपला राजीनामा भाजपच्या गोवा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे बंडाळी रोखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या समोर बोलताना सांगितले की, भाजपने तिकीट दिले नाही, त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. 2017 साली भाजपने मला मांद्रे मतदार संघातून तिकीट दिले होते. त्यावेळी मी लोकांचा उमेदवार बनू शकलो नव्हतो. पण आता मी लोकांचा उमेदवार बनलो आहे. मात्र आता पक्षाने मला तिकीट दिले नाही. त्यामुळे पार्सेकर यांनी तिकीट नाकारल्यानंतर पार्सेकर यांच्या समर्थकांनी मंड्रेम आणि परसुआडेड येथे बैठक घेत अपक्ष निवडणूक लढवण्यास सांगितले. त्यामुळे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडे पाठवला.

लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावेळी भाजपचे प्रदेश सचिव सतिश धोंड यांच्यावर निशाणा साधला. तर त्यांनी पक्ष सोडण्यास मजबूर केल्याबद्दल अभिनंदन अशा शब्दात सतिश धोंड यांना टोला लगावला. त्यामुळे उत्पल पर्रिकरांपाठोपाठ माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने गोव्यात बंडाळी थांबवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर उभे ठाकले आहे.

कोण आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर-

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांना 8 नोव्हेंबर 2014 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर 21 मार्च 2017 पर्यंत लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर होते. त्यानंतर पुन्हा मनोहर पर्रिकर यांना गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पाठवण्यात आले. त्यामुळे लक्ष्मीकांत पार्सेकर यांना राजीनामा द्यावा लागला होता. 

Tags:    

Similar News