अखेर प्रतिक्षा संपली; झारखंड- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तारीख आज जाहीर होणार!
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आज दुपारी ३.३० वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ होणार आहे, ज्यासाठी राज्यातील मतदार आणि राजकीय पक्ष उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते.
महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे, तर झारखंड विधानसभेची मुदत ५ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन विधानसभा गठीत होणे आवश्यक आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधीच स्पष्ट केले होते की, २६ नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि निकाल पूर्ण केले जातील.
निवडणुकीच्या संभाव्य तारखांबाबत अधिक माहिती देताना, राजीव कुमार म्हणाले की, त्यांनी स्थानिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत दिवाळीच्या महोत्सवाचा विचार करून निवडणुकीच्या तारखांची जाणीव ठेवावी, अशी विनंती अनेक पक्षांनी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ मतदारसंघ आहेत, आणि येथे ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार ४.५९ कोटी, तर महिला मतदार ४.६४ कोटी आहेत. विशेषतः तृतीय पंथीय, वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १९.४८ लाख नवमतदारांचा सहभाग ही निवडणुकीसाठी महत्त्वाची बाब आहे.
या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा आणि संबंधित सर्व माहिती जाहीर केली जाईल, ज्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आज होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.