शेतकऱ्यांच्याच नशिबी नरकयातना का..? पाचवीलाच पुजालाय संघर्ष...

Update: 2022-01-05 08:08 GMT

वीज अमर्याद उपलब्ध असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात असला तरी शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत असूनविजेच्या वेळापत्रकानुसार रात्री कांदा लागवड करावी लागत आहे. वेळापत्रक बदलासाठी ग्रामपंचायत ने मागणी करूनही दखल नाही...

शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत, संघर्ष हा जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलाय... आता या सर्व अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देताना शेतकरी पुरता हताश होताना दिसतोय... दिवसा लोडशेडिंग असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात कांदा पिकाची लागवड करावी लागत असल्याचे, धक्कादायक वास्तव समोर आले आहे...

बुलडाणा जिल्ह्यात बहुतांश शेतकरी हे कांदा लागवड करत असतात, आणि आता या कांदा लागवडीला सुरुवात झालीये, मात्र महावितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतातील विजेवर दिवसा भारनियमन असून रात्रीची वीज दिली जात आहे, त्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात जीवघेणी कसरत करून कांदा लागवड करावी लागत आहे...

जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यात प्रामुख्याने कांदा हे मुख्य पीक घेतले जाते, आणि जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड केली जाते, याची लगबग आता शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे... मात्र जळगाव जामोद तालुक्यातील जामोद फिडर अंतर्गत दिवसा लोडशेडिंग असल्याने किमान कांदा लागवड होईपर्यंत, म्हणजे जानेवारी महिन्यात तरी संबंधित अधिकाऱ्यांनी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार करण्यात आली, एवढेच नव्हे तर जामोद ग्रामपंचायत सरपंच यांनी आपल्या लेटरपॅडवर देखील संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना अशी मागणी केली आहे, मात्र या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांप्रति कुठलीच आपुलकी दाखवली गेली नसून, पर्यायाने शेतकरी आता रात्रीची कांदा लागवड करताना दिसत आहेत... त्यामुळे राज्यकर्त्यांनी जगाचा पोशिंदा खंबीर पणे उभा करण्यासाठी किमान जानेवारी महिन्यात तरी, दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी आणि त्याच्या नरकयातना कमी कराव्यात, अशीच मागणी आता यानिमित्ताने केली जात आहे...

Tags:    

Similar News