जोपर्यंत साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे उसाची वाहतूक होवू दिली जाणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
नगर (Ahmednagar) जिल्हा हा साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून राज्यभर परिचित आहे. मात्र, जिल्ह्यात उसाला दर जाहीर झाला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्याचे पडसाद आज शेवगाव तालुक्यात दिसून आले. शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers’ Movement) सुरू केले आहे.
शेवगाव तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांकडून ऊस दराची घोषणा व्हावी, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी साखर सहसंचालक शेवगाव तहसीलदार व साखर कारखानदार यांना निवेदन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत चालू हंगामामध्ये साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न केल्यामुळे आज (बुधवारी) सकाळी शेवगाव पैठण रस्त्यावरील गंगामैय्या साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली.
जोपर्यंत साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे उसाची वाहतूक होवू दिली जाणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी घेतली आहे.