देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि त्यांच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातामुळे देशात खळबळ उडाली होती. हा अपघात नेमका कशामुळे झाला, यामागे घातपात होता का असेही प्रश्न त्यावेळी उपस्थित झाले होते. पण आता या अपघाताचे कारण प्राथमिक चौकशीमधून समोर आले आहे. या समितीने संरक्षण मंत्रालयाला हा अहवाल सादर केला आहे.
तामिळनाडूमधील कुन्नूर येथे ८ डिसेंबर रोजी हा भीषण अपघात झाला होता. यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आला आहे. बार अँड बेंच या कायदेविषयक वृत्त देणाऱ्या संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. यासंदर्भात चौकशी करणाऱ्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. चौकशी समितीने फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपीटमधील रेकॉर्डींगचा अभ्यास केला, तसेच काही साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी समितीने या अपघातामागे तांत्रिक समस्येमुळे अपघात झाल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच यामध्ये कोणतीही मानवी चूक देखील झालेली नाही, असेही म्हटले आहे. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये शिरलं आणि पायलटला अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा असा निष्कर्ष चौकशी समितीने काढलेला आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी या निष्कर्षांच्या आधारावर काही शिफारशी देखील समितीने केल्या आहेत.
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह तामिळनाडूमध्ये एका कार्यक्रमासाठी निघाले होते. पण मध्येच त्यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि हेलिकॉप्टर खाली कोसळले. यामध्ये बिपीन रावत यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. तर बिपीन रावत यांचे उपचारा दरम्यान निधन झाले होते.