एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते; पण १५ दिवसांत परिस्थिती बदलली – उदय सामंतांचा गौप्यस्फोट

Update: 2024-11-18 06:23 GMT

"उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत स्पष्टपणे जाहीर केलं होतं की, एकनाथ शिंदे हेच पुढचे मुख्यमंत्री असतील. मात्र, त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत परिस्थिती कशी बदलली हे आजपर्यंत समजलेलं नाही," असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मॅक्समहाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे.

Full View

उदय सामंत यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे यांनी उठाव केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीचे तीन दिवस शिंदे गटाशी कोणताही संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा पाठिंबा वाढत असल्याचं स्पष्ट दिसत असताना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांना परत आणण्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही," असं सामंत यांनी नमूद केलं.

सामंत पुढे म्हणाले, "मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांना परत आणावं, असं सुचवलं होतं. मी आदित्य ठाकरे यांच्याशीही याबाबत बोललो. परंतु, उद्धव ठाकरे यांनी फक्त आश्वासनं दिली; प्रत्यक्षात मात्र काहीच केलं नाही. त्यांचा नेत्यांशी संवादाचा अभाव आणि हलक्या कानांमुळे शिवसेनेचं नुकसान झालं."

शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय

उदय सामंत यांनी स्पष्ट केलं की, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. "मी आक्रमक आहे, पण अनावश्यक त्रास देणं मला मान्य नाही. त्यामुळेच शिंदे यांच्यासोबत जाणं मला योग्य वाटलं," असं त्यांनी सांगितलं.

उद्योगक्षेत्रातल्या टीकेला प्रत्युत्तर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्योग खात्यावर आणि स्वतः सामंतांवर वैयक्तिक हल्ले झाले. मात्र, त्याचा सामना करताना त्यांनी केलेल्या कामांवर विश्वास ठेवला आहे. "महाराष्ट्रात गुंतवणूक कमी होत असल्याचा आरोप वारंवार होतो. परंतु, आरबीआयच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र ५२% गुंतवणूक घेऊन देशात अव्वल स्थानावर आहे," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

सामंत यांनी उद्योग धोरणावर भर देताना स्थानिक उद्योजकांनाही प्रोत्साहन दिल्याचं नमूद केलं. "दावोसला जाऊन परदेशी गुंतवणूकदारांना रेड कार्पेट दिलं जातं; तसंच स्थानिक उद्योजकांना देखील तोच मान दिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे," असं ते म्हणाले.

राजकीय संस्कृती आणि भविष्यातील महायुती

सामंत यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवर टीका करत संयमाने आणि सुसंस्कृतपणे वागण्याचं आवाहन केलं. "आम्ही कोणावर जहरी टीका करत नाही; उलट, विकासकामांची छोटी रेघ पुसून मोठी रेघ आखण्यावर आमचा भर आहे," असं ते म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७५ जागा मिळतील, असा आत्मविश्वास सामंत यांनी व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केलं की, कोकण पट्ट्यातून ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला हद्दपार करणारं वातावरण आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

"उद्धव ठाकरे नेहमी 'बाप चोरला' असं म्हणतात, पण आम्ही विचारांचे वारसदार आहोत," असं म्हणत सामंत यांनी ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेला काँग्रेसच्या विळख्यातून सोडवण्यासाठी शिंदे गटाने निर्णय घेतला, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

उद्योजकांसाठी महाराष्ट्राचं सुरक्षित वातावरण

सचिन वाझे प्रकरणाचा उल्लेख करत सामंत म्हणाले, "अंबानींच्या घरासमोर जिलेटीन ठेवल्याने राज्याची प्रतिमा खराब झाली. परदेशी गुंतवणूकदार घाबरले. मात्र, शिंदे सरकार आल्यावर दक्षिण कोरियाच्या उद्योजकांनी दुप्पट गुंतवणुकीसह राज्यात पुनरागमन केलं."

उदय सामंत यांच्या या परखड वक्तव्यांनी राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यांच्या विधानांमुळे आगामी राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Tags:    

Similar News