मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या मेहूण्यावर ईडीची कारवाई, वाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रीया

गेल्या काही दिवसांपुर्वी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ ईडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधातील फास आवळायला सुरूवात केली. त्यातच ईडीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेहुण्याची 6.45 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करत कारवाई केली आहे. त्यावरून राज्यात रणकंदन माजले आहे.;

Update: 2022-03-22 15:34 GMT

ईडीने अटक केल्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांकडून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड (गृहनिर्माण मंत्री)

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई करत 6.45 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. त्यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तसेच हे सुडाचे द्वेषाचे आणि असुयेचे राजकारण आहे. तर विरोधी पक्ष म्हणून सरकार अस्थिर करणे हे त्यांचे काम आणि धर्म आहे. परंतू अशा प्रकारे राजकारण करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे ईडीच्या कारवायांसाठी पीएमएलएसारखा जामीन न मिळणारा कायदा करायचा हेच लोकशाहीचा मुडदा पाडण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रीया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.


धनंजय मुंडे ( सामाजिक न्याय मंत्री) 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ईडीने आतापर्यंत 58 हजार कोटींपेक्षा अधिक संपत्तीची चौकशी केली आहे. परंतू त्यापैकी किती निकाली निघाल्या याचे उत्तर आपल्या समोर आहे. त्यामुळे माध्यमांनीही याबाबत बोललं पाहिजे आणि खोदून माहिती काढली पाहिजे. तसेच अशा कारवायांमुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही, अशी प्रतिक्रीया धनंजय मुंडे यांनी दिली.

नाना पटोले (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाई केल्याचा राज्य सरकार पडण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तर लोकशाही व्यवस्थेत बहुमताच्या जोरावर भाजपकडून सुरू असलेल्या यंत्रणांचा परिणाम भाजपला भोगावा लागेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

भाजप नेत्यांच्या प्रतिक्रीया-

प्रविण दरेकर ( विरोधीपक्षनेते, विधान परिषद)

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेहूण्यावर केलेल्या कारवाईवर प्रतिक्रीया देतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले की, त्यांनी सुडबुध्दीने कारवाई केली तर ती चालते. पण त्यांच्यावर कायद्याने कारवाई झाली तर ती चालणार नाही, अशी भुमिका घेतली जाते. यामध्ये आपला तो बाबु आणि इतरांचे ते कार्टे असे राज्य सरकार वागत असल्याचे प्रविण दरेकर म्हणाले.

गिरीश महाजन-

श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाईवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी सांगितले की, पुरावे समोर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. आतापर्यंत अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली. त्यामध्ये जर चुकीची कारवाई असती तर न्यायालयाने त्यांना जामीन दिला असता. मात्र त्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे न्यायालयाने त्यांना जामीन दिला नाही. त्यामध्ये भाजपचा काहीही संबंध नाही. तसेच त्यांनी केलेल्या कामाची ही पावती असल्याची प्रतिक्रीया गिरीश महाजन यांनी दिली. 

चंद्रशेखर बावनकुळे-

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, तपास यंत्रणांकडे असलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली असेल. यामध्ये भाजपचा काडीमात्र संबंध नाही. तर कोणाच्याही इशाऱ्यावर या यंत्रणा काम करतात, असं मला तरी वाटत नाही, अशी प्रतिक्रीया चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त  केली. 


Tags:    

Similar News