लग्न समारंभामुळेच संगमनेर तालुक्यात कोरोना रूग्ण वाढले - प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे
लग्न समारंभादरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने संगमनेर तालुक्यात कोरोना रूग्ण वाढल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी म्हटले आहे. येत्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मंगरूळे यांनी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अहमदनगर जिल्ह्यात लग्न समारंभासाठी उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध आणलेले असताना देखील नागरिक सर्रासपणे नियमांची पायमल्ली करत असल्यानेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोना रूग्णसंख्या वाढली असल्याचे मत प्रांतधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी म्हटले आहे. डॉ.मंगरूळे यांनी संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागाचा दौरा केला. त्यानंतर डॉ. मंगरूळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तसेच संगमनेर भागामध्ये कोरोना रूग्णसंख्या अधिक आहे. याबाबत पत्रकारांनी पठार भागात वाढणाऱ्या कोरोना रूग्णसंख्याबाबत विचारले असता त्यांनी वाढत्या कोरोना रूग्णसंख्येला लग्नसमारंभातील गर्दी कारणीभूत असल्याचे डॉ.मंगरूळे यांनी म्हटले आहे. लग्नसमारंभात अतिरिक्त उपस्थितांची संख्या, तसेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणे अशा गोष्टी पठार भागात दिसून येत आहे. प्रशासनाकडून वारंवार सुचना दिल्या जात असतानाही नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसल्याचं डॉ.मंगरूळे यांनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज 700 पेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
तालुक्यात निर्बंध असताना देखील तालुक्यातील दुकाने सर्रासपणे सुरू असतात. त्यामुळे यापुढे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे.