रायगड जिल्ह्यात ढगफुटी झाल्याप्रमाणे जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळील अंबा नदी पुलावरून बुधवारी पाणी गेले आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. मंगळवारीही दुपारी 12 नंतर पुलावरून पाणी गेले होते, तब्बल 9 तासांनी म्हणजे रात्री 9 वाजल्यानंतर ओसरले. परिणामी सलग दुसऱ्या दिवशीही पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक खोळंबली आहे. प्रवासी आणि विदयार्थी यांचे पुरते हाल झाले आहेत. तसेच रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा देखील लागल्या होत्या.
सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी देखील पालीतून नागोठणे व सुकेळी येथील शाळेत गेलेली 100 हुन अधिक मुले पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. ती मुले रात्री नऊ नंतर पालीला आपल्या घरी पोहचली. ही मुले 7 ते 9 तास पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. यामुळे पालक खूप चिंतातुर झाले होते, असे पालीतील पालक डॉ. मयूर कोठारी यांनी सांगितले. शिवाय खेडेगावातून पालीला शाळेत व महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांना देखील सलग दुसऱ्या दिवशी अडकून पडावे लागले, असे शिक्षक शरद निकुंभ यांनी सांगितले.
पुलावरून पाणी जात असताना कोणीही पुलावरून प्रवास करू नये, तसेच सर्व तालुका प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचा व खबरदारीच्या सूचना दिल्या असल्याचे सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायणावर यांनी सांगितले. वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पुल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवासी वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. परिणामी पाली येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने हे प्रवासी व वाहने दोन्ही बाजूस अडकून पडली असून त्यांची गैरसोय झाली.
अंबा नदीवरील पूल जुना अरुंद व कमी उंचीचा आहे. या पुलाच्या बाजूला नव्याने मोठा पूल बांधण्यात येत आहे. मात्र कामातील दिरंगाई व संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे या पुलाचे काम अपूर्ण आहे. या पुलाचे काम वेळीच पूर्ण झाले असते तर प्रवासी व विद्यार्थ्यांचा असा खोळंबा व गैरसोय झाली नसती, असे मत इथले नागरिक व्यक्त करत आहेत.
तसेच पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण आहे. कुंभारशेत येथील हिराकांत भगत म्हणाले की पाली खोपोली महामार्गावरील पाली पुल हा 1950 साली बांधलेला पुल आहे, सद्यस्थितित हा पुल जुना व जर्जर झाला असून वाहतुकीस अत्यंत धोकादायक असा आहे. या पूला वरुन दरवर्षी पाणी जाते, व विद्यार्थ्यांसह नागरिक, कामगार वर्ग, रुग्ण, सर्वांचे हाल होतात, नवीन पुलाचे काम कधी होणार? असा सवाल भगत यांनी विचारला.
नियमित प्रवासी असलेले आदेश कांबळे म्हणाले की पाली हे सुधागड़ तालुक्याचे मुख्यालय असून शासकीय व निमशासकिय कामे, तसेच कोर्ट कचेरी, दवाखाना, शाळा , महाविद्यालय या ठिकाणी नियमितपणे नागरिक, विद्यार्थी येतात. मात्र आठ आठ तास पुलावरुन जाणारे पाणी कधी उतरेल, वाहतूक कधी सुरु होईल, याची प्रतीक्षा करावी लागते, प्रशासन याकडे गांभिर्याने कधी बघणार? जनतेचे हाल कधी थांबणार? आदिवासी बहुल तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतेय, सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कांबळे यांनी केली.