इतर राज्यात ईडीला काम नाही का? मुख्यमंत्री संतापले

राज्यात ईडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईला वेग आला असतानाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी इतर राज्यात ईडीला काम नाही का? असा सवाल केला आहे.

Update: 2022-02-26 01:50 GMT

 राज्यात भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत राळ उडवून दिली आहे. त्यातच ईडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी आणि अटकेचे सत्र सुरू केले आहे. त्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संताप व्यक्त करत महाराष्ट्र व बंगाल वगळता इतर राज्यात ईडीला काम नाही का? असा संतप्त सवाल केला. मुख्यमंत्री लोकसत्ताच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष निर्माण झाला आहे. त्यातच भाजपकडून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या तारखा जाहीर केल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीच्या नोटीसी पाठवून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीसी आणि चौकशीचे आदेश यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

 गुजरातमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला, गुजरामधील बंदरावर मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सापडले. पण आपल्याकडे चिमुटभर सापडले तर किती मोठा गजहब केला, असे म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आपल्याकडे तुळसीवृंदावन ची संस्कृती सोडून गांजा वृंजावनची संस्कृती रुजली आहे आणि आपल्याकडे गांजाची शेती केली जात असल्याचे चित्र उभा केले जात आहे. तसेच घराघरात टेरेसवर गांजाच गांजा आहे, असे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र आणि बंगाल वगळता इतर राज्यात ईडीला काम नसल्याचा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लगावला.

यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, तुम्ही महाराष्ट्राचा देशासाठी आधार म्हणून का उपयोग करत नाही? महाराष्ट्र देशातील सडका भाग आहे, अशा पध्दतीने देशात राजकारण सुरू आहे. तर राज्यात धाडीमागून धाडी टाकल्या जात असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत संताप व्यक्त केला. मात्र प्रत्येकाचे दिवस असतात आणि ते बदलतात असे म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला.

Tags:    

Similar News