महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटेपर्यंत तो भाग केंद्रशासित करा – मुख्यमंत्री
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील बेळगावसह इतर सीमाभागाचा वाद मिटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे.
दीपक पवार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे असे म्हणत हा भाग महाराष्ट्रात आणणारच असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी सीमाभागातील मराठी बांधवांवर अन्याय होतो, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.