Ground Report: वर्ध्यात कोरोना बळींच्या आकड्यांची लपवाछपवी
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप होतो आहे. वर्धा जिल्ह्यात असा प्रकार घडला असल्याचे दाखवणारा आमचे प्रतिनिधी प्रणय ढोले यांचा ग्राऊंड रिपोर्ट...;
कोरोनाच्या संकटाला आपल्या देशात प्रवेश करुन आता एक वर्षाच्या वर काळ उलटून गेला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आणखी रौद्र रुप धारण केल्याने या लाटेत अनेकांचे बळी गेले आहेत. पण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या आकडेवारीतही लपवाछपवी होत असल्याचा आरोप होतो आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही थेट मुख्यमंत्र्यांकडेच यासंदर्भात तक्रार केली आहे. पण केवळ राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या गदारोळात या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी मॅक्स महाराष्ट्रने प्रत्यक्ष फिल्डवर काय घडते आहे याचा आढावा घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेले लोक आणि स्मशानभूमीत कोरोनाच्या रुग्णांवर अंत्यसंस्कार झाल्याची आकडेवारी याच्यात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच वर्धा जिल्ह्यात एकाच दिवशी 41 शवांना अग्नी देण्यात आला होता. पण प्रशासनाच्या यादीत 16 जणांची नोंद करण्यात आल्याचे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने दाखवले होते. मॅक्स महाराष्ट्रने २२ तारखेला या संदर्भातले वृत्त पहिल्यांदा दिले. प्रशासनाकडून मृतांच्या संख्येबाबतचा घोळ होत असल्याच्या या वृत्तानंतर आमचे प्रतिनिधी प्रणय ढोले यांनी आणखी खोलात जाऊन जेव्हा शोध घेतला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत वर्धा जिल्ह्याला खूप कमी प्रमाणात झळ बसली होती. पण दुसऱ्या लाटेत मात्र मोठमोठे आकडे येऊ लागले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आकडे वाढू लागले आहेत. हा आकडा एकदा तर तब्बल ९००च्यावर गेला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पण तिथल्या प्रशासनाच्या या आकड्यांबाबतच्या दाव्यावर एका व्हिडीओने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.
१७ एप्रिल ते २५ एप्रिल या 9 दिवसांच्या काळातील आकडेवारीच्या आधारे आपण यामधील सत्य शोधण्याचा प्रयत्न करुया...
१७ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यात ४९३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर 18 एप्रिलला- ६१३ रुग्ण आढळले होते. 19 एप्रिल हीच संख्या ५७८ झाली. 20 एप्रिल मात्र मोठी वाढ होत ही संख्िया ७३०,पर्यंत पोहोचली. 21 एप्रिल रोजी - ५७३, 22 एप्रिल रोजी -७५५, 23 एप्रिल - ७५२ अशा प्रमाणात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या होती. आतापर्यंतच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील सर्वात मोठी आकडेवारी २४ एप्रिल रोजी ९३२ एवढी नोंदवली गेली आहे. ही तर झाली कोरोनाबाधीत रुग्णांची आकडेवारी....
आता कोरोनामुळे वर्धा जिल्ह्यात किती रुग्ण मृत्यूमुखी पडले याची १७ एप्रिल ते २५ एप्रिल या काही दिवसांमधील आकडेवारी पाहूया.....
१७ एप्रिल रोजी वर्धा तालुक्यात १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 18 एप्रिल रोजी १३, 19 एप्रिल रोजी – ११, 20 एप्रिलला १२, 21 एप्रिल रोजी २०, 22 एप्रिल रोजी १६, 23 एप्रिल रोजी १७ 24 एप्रिल रोजी ३१ आणि २५ एप्रिल रोजी १२ जणांचा मृत्यू झाला. म्हणजे शासकीय आकडेवारीनुसार सात दिवसात एकूण १७८ लोकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी शासकीय नोंदणी प्रमाणे आहे. प्रत्यक्षात स्मशानभूमीमधील नोंदणी रजिस्टरमध्ये आमच्या प्रतिनिधीने मोजणी केली तेव्हा ही संख्या २८५ एवढी होती.
कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू याची संख्या लक्षात घेता वर्धा जिल्ह्यात अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाने वेगळा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील 8 तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तालुकानिहाय एक स्मशानभूमी निश्चित करण्यात आली आहे. वरील आकडेवारी वर्धा तालुक्यातील आहे. याचाच अर्थ कोरोना बळींची संख्या आणि प्रत्यक्षात कोरोनामुळे होणारे मृत्यू यामध्ये कुठेतरी तफावत दिसते आहे.
वर्धा तालुक्यात असलेल्या मुख्य वैकुंठधाम येथे मृतांची नोंदणी करणाऱ्या दिलीप कुथे यांना आम्ही यासंदर्भात विचारला असता, स्मशानभूमीमध्ये रोज किती लोकांवर अंत्यसंस्कार होतात याची माहिती आपण स्वत: लिहितो असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले तो कोरोनाबाधीत होता का याचीही नोंद त्या रजिस्टरमध्ये केली जाते. आपण रोज जेवढ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतो तेवढ्या सगळ्यांची नोंद करत असल्याचे दिलीप कुथे यांनी सांगितले.
यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने उपविभागीय दंडाधिकारी सुरेश बगळे यांना संपर्क केला, त्यांनी भेटण्याची वेळ दिली, पण दिवसभरात ते भेटले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळताच बातमीमध्ये अपडेट करण्यात येईल.
"वर्धा जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भोंगळ कारभार सुरू आहे आणि अशातच ही आकडेवारी समोर येणे म्हणजे चिंताजनक आहे. या सर्व प्रकाराची तात्काळ चौकशी झाली पाहिजे अन्यथा युवा परीवर्तन की आवाज संघटनेतर्फे मोठा आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निहाल पांडे यांनी दिला आहे.
तर या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विकास दांडगे यांनी केली आहे.
ही आकडेवारी केवळ वर्धा तालुक्यातील आहे. याचा अर्थ वर्धा जिल्ह्यातील ८ तालुक्यांचा विचार केला तर या आकडेवारीत मोठी तफावत असू शकते. असे किती कोरोनाबळी शासकीय नोंदणीमध्ये आलेच नसतील ते सांगता येणार नाही. पण यावरुन संपूर्ण राज्याचा विचार केला तर नोंदणी झालेले कोरोना मृत्यू आणि स्मशानभूमीच्या नोंदवहीमधली आक़डेवारी याच्यात फरक असण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसते आहे. राज्यात अनेक ठिकाणी स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेल्या मृतदेहांची दृश्यं देखील आकडेवारीची तफावत सांगतच आहेत. अनेक ठिकाणी तर स्मशानात जागा नसल्याने मोकळ्या जागांवर अंत्यसंस्कार केले गेल्याचीही दृश्य समोर आली आहेत. त्यांची नोंदणी कुठे झाली आहे का याचाही विचार होणे गरजेचे आहे. कोरोना बळींची आकडेवारी कमी दाखवल्याने संकटाची तीव्रता कमी होणार नाहीये किंवा कोरोनाचा संसर्गही जाणार नाहीये. त्यामुळे प्रशासनाला आता अधिक सतर्क होऊ या सगळ्याचे नियोजन करावे लागेल. सध्या फक्त हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे का, बेेड न मिळाल्याने उपचाराअभावी जीव गेलेल्या रुग्णांचा यात समावेश होतो आहे का असेही प्रश्न आता निर्माण झाले आहेत.