जीवनातील दुःख निवारण्याचा मार्ग बौद्ध धम्मात :महाथेरो अजाह्य जयासारो

Update: 2023-01-17 09:01 GMT

तथागत बुद्धांचा धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्यात कर्मकांडाला थारा नाही. हा धम्म मानव केंद्रित असून तथागताने दुःख निवारण्याचा मार्ग बौद्ध धम्माच्या निमित्ताने दिला असल्याचे जगविख्यात बौद्ध धर्मगुरू महाथेरो अजाह्य जयासारो यांनी सांगितले.

जगविख्यात बौद्ध धर्मगुरू महाथेरो थायलंड येथून भारत भेटीसाठी आले होते. या वेळी त्यांनी विविध भिक्खू संघटनांना भेटी दिल्या. त्यांच्या या भेटीदरम्यान दादर येथील श्री शिवाजी मंदिरात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

अजाह्य जयासारो हे त्यांच्या धम्म शिकवणी आणि ध्यान धारणेसाठी जगभरात ओळखले जातात. ते उपासक आणि भिक्खू या दोघांनाही कायम प्रेरणा देत असतात. आजच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दादर येथील शिवाजी मंदिर येथे भिक्खू संघासाठी चिवरदान करण्याचा कार्यक्रम देखील पार पडला. या प्रसंगी जागतीक कीर्तीचे आदरणीय 'महाथेरो अजाह्य जयासारो' यांच्या धम्मावर आधारित मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, मी लहानपणीच

बुद्धांच्या शिकवणीकडे आकर्षित झालो. धम्म शिकवण ही अगदी सरळ आहे. मात्र आपण धम्म सांगण्यासाठी क्लिष्ट भाषेचा उपयोग करत असल्याने ती अधिक जटिल बनते. त्यामुळे धम्म सांगण्यासाठी सहज-सोप्या लोकांना समजणाऱ्या भाषेचा उपयोग करा असेही ते म्हणाले. बुद्धांची शिकवण वेळेच्या असल्याचे ही त्यांनी सांगितले.

बंधनात अडकणारी नाही. म्हणून तिचे प्रतिबिंब वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये दिसते. माणसाने अहंकार म्हणजेच मी पणा सोडणे गरजेचे आहे. तथागतांच्या धम्मात श्रद्धेला महत्व आहे. मात्र त्यांच्या श्रद्धेला नीट समजून घ्यायला हवे अन्यथा आपण अंध श्रद्धेकडे वळण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात चिवरदान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात उपासक मोठ्या संख्येने स्वहस्ते चिवरदान करून सहभागी झाले. चीवरदान सोहळ्यासाठी उपासकांची नोंदणी आठवडाभर आधीच करण्यात आली होती. चिवरदान कार्यक्रमाला मुंबई आणि आसपासच्या भागातील उपासकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ज्यांची चिवरदान करण्याची ईच्छा आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे ज्या उपासकांना चिवर आणणे शक्य नव्हते अश्या उपासकांना मेत्ता 'ग्लोबल फाऊंडेशनतर्फे मोफत चिवर उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन 'मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन'ने केले होते.

Tags:    

Similar News