राज्यातील पोलीस दलातील बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ज्या माहितीच्या आधारे केला होता, त्या प्रकरणात आता देवेंद्र फडणवीस यांना साक्षीसाठी हजर रहावे लागण्याची शक्यता आहे. सायबर विभागाने या फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरणात देवेंद्र फडणवीस हे आपले प्रमुख साक्षीदार असल्याची माहिती कोर्टाला दिली आहे. IPS अधिकारी रश्मी शुक्ला ह्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना राज्यातील पोलीस दलात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या संशयाने काही नेते आणि एजन्ट्सचे फोन टॅप करण्यात आले होते. याचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी तयार केला होता. पण अहवाल गुप्त असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तसेच यासंदर्भातली सर्व कागदपत्रं आपण केंद्रीय गृहमंत्रालयाला देणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर सायबर विभागाने कोर्टात याचिका दाखल करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातली माहिती राज्य सरकारला द्यावी, असे आदेश कोर्टाने द्यावे, अशी मागणी केली आहे. याच याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य सरकारला विचारले की केंद्रीय गृहमंत्रालयाकडे यासंदर्भातली कागदपत्रं असल्याचा आपल्याकडे पुरावा काय आहे, त्यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत तशी घोषणा केली होती, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली. तसेच फडणवीस याप्रकरणात प्रमुख साक्षीदार आहेत, पण त्यांनी आमच्या पत्रांना उत्तर दिलेले नाही, अशीही माहिती सरकारतर्फे कोर्टात देण्यात आली. यावर आता कोर्ट २८ डिसेंबर रोजी निर्णय देणार आहे.
दरम्यान यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त लोकसत्तामध्ये देण्यात आले आहे, आपल्याला सायबर सेलने चौकशीसाठी बोलावलेले नाही तर एक प्रश्नावली पाठवली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच सायबर सेलचे पत्र मिळाल्याचे सांगत त्यांनी यावर आपण योग्यवेळी बोलू अशीही माहिती दिली आहे. पण एक विरोधी पक्षनेता असल्याने भ्रष्टाचार उघड करणे आपला अधिकार आहे आणि आपल्याला कुणी माहिती दिली हे विचारण्याचा सरकारला अधिकार नाही, असा दावाही त्यांनी केला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.