Mohan Delkar Death Case: सुप्रिया सुळे यांनी घेतली लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधी पक्षाच्या खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत एक निवेदनही दिले.
सुप्रिया सुळे यांनी या निवेदनात खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि तेवढीच धक्कादायकही आहे. सातवेळा खासदारकी भूषवणारे मोहन डेलकर इतके निराश झाले होते, वैफल्यग्रस्त झाले होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आपण आपल्या सहकाऱ्याला गमावलं आहे. तुम्ही लोकसभेचे प्रमुख आहात. त्या नात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जावी अशी मागणी केली. दरम्यान भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ते उपाय योजण्याची गरज आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या पत्रात सुचवले आहे.
काय आहे प्रकरण?
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी खासदार मोहन डेलकर यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत काही व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी SIT ची नेमणूक करण्यात आली आहे.