महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा तापला, सीमावासियांचे शरद पवार यांना साकडे
बेळगाव : गेल्या काही दिवसात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अनेक घडामोडी घडत आहेत. कर्नाटकमधील विविध पक्षीय नेते वारंवार वादग्रस्त वक्तव्य करुन सीमावास संपला असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांमध्ये दिसते आहे.
कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा व वन मंत्री उमेश कत्ती यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून मराठी लोकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर कर्नाटकाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे सांगत त्यांनी स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी केली आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समिती आता संपली आहे, असे वक्तव्यही केले आहे, तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी देखील सीमाप्रश्नावर खोचक टिप्पणी करून महाराष्ट्र एकीकरण समितीसह सीमाभागातील मराठी माणसावर तोंड सुख घेतले होते. सीमाप्रश्नाबाबत संपूर्ण कर्नाटकातील विविध पक्षांचे नेते हे एकवाक्यता दाखवत आक्रमक झाले आहेत, तशी एकजूट महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते मंडळी का दाखवत नाही, असा प्रश्न सीमाभागातील मराठी लोकांनी उपस्थित केला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील पत्रकार व इतर काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती इथे भेट घेतली. तसेच सीमाभागातील या बदलत्या वातावरणाची माहिती दिली. शरद पवार यांनी १९९३ साली सीमाप्रश्नाबाबत केलेल्या मध्यस्थीच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे, याची देखील माहिती देण्यात आल्याचे पत्रकारांनी सांगितले. यावर शरद पवार यांनी दिवाळी नंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करुन असे पवार यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादामध्ये एकीकडे कर्नाटक आक्रमक आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारची उदासीनता दिसत असल्याचे म्हटले जाते आहे. १ नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकारमधील मंत्रांनी दंडाला काळ्या फिती बांधून सीमावासियांच्या सोबत असल्याचे विधान केले आहे. मात्र प्रत्यक्षात सीमाभागातील मराठी जनतेला अजून सरकारची भूमिका कळलेली नाही, असेही या या लोकांना वाटते आहे,