इंधन तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात शिर्डीत 'दे धक्का' आंदोलन

Update: 2021-10-10 13:53 GMT

मागील काही महिन्यापासून इंधन तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. या महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलिंडर तब्बल 15 रुपयांनी महागला आहे. या इंधन आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. या दरवाढी आणि महागाईविरोधात कॉंग्रेसच्या वतीने आज (10 ऑक्टोबर) शिर्डी येथे 'दे धक्का' आंदोलन करण्यात आले. शिर्डी शहरातील नगरपंचायत समोरुन दुचाकीला ढकलत नेत काँग्रेसने हे आंदोलन केले.

दरम्यान यावेळी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, विधानसभेचे नेते सुरेश थोरात आणि कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्या नेत्वृवाखाली हे आंदोलन करण्यात आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर हे 'दे धक्का' आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिर्डी शहरातील नगरपंचायतीसमोर दुचाकीला ढकलत नेत जोरदार घोषणाबाजी केली.

दसरा आणि दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच सामान्य नागरिकांना महागाईचा तडाखा बसणार आहे. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि पीएनजीपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 6 ऑक्टोबरपासून घरगुती LPG सिलिंडरचे वाढीव दर जाहीर केले आहेत. त्यानुसार विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी 844.50 रुपयांवरुन 899.50 रुपये मोजावे लागत आहे. तर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरचा दर 884.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतका झाला आहे. तसेच देशातील इतरही भागात ही दरवाढ करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Tags:    

Similar News