गोस्वामी दांम्पत्यांवर मुंबई पोलिसांचा बदनामीचा खटला
वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात अखेर मुंबई पोलिसांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला असून यामध्ये मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुबई पोलिसांच्या वतीनं पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. तसेच मुंबई पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनीही अर्णब गोस्वामी आणि कुटुंबियांविरोधात अब्रुनुकसानीचा वैयक्तिक दावा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 499, कलम 500 आणि कलम 501 अंतर्गत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई सत्र न्यायालयात हा दावा दाखल केला आहे.
त्रिमुखे यांच्या तक्रारीमधे त्यांच्यावर आणि मुंबई पोलिसांवर बदनामीकारक टीका केली गेली आहे आणि सुशांत सिंग प्रकरणात रिपब्लिक टिव्हीवर ७ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या चर्चेदरम्यान, गोस्वामी यांनी त्यांच्याविरोधात बदनामीकारक टीकेचा आरोप केला त्रिमुखे यांनी असा आरोप केला की, गोस्वामी ट्विटर हँडल @arnab5222 वर सुमारे २ लाख फॉलोअर्स असून त्यातूनही बदनामी करण्यात आली आहे.
अलिबागमधील वास्तूरचनाकार अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी या आधीच अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिलासा दिला होता. नंतरच्या काळात मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याशी संबंधित ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांना आणि इतर काही लोकांना अटक केली आहे.
काही दिवसापूर्वीच रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. पार्थ दासगुप्ता हे टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आहे.
मुंबई पोलिसांच्या या नव्या बदनामीच्या तक्रारीमुळे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.