उद्योग जगताला मोठा धक्का;टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रींचा अपघाती मृत्यू
भारतीय उद्योग जगाला मोठा धक्का बसेल अशी बातमी असून टाटा संस्थे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.;
पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचं समजत आहे. अपघातात दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीसांनी सांगितले आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोन जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे". दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केली आहे.
सुप्रिया सुळेंनीही सायरस मिस्त्री हे किती साधे होते याच्या आठवणी सांगितल्या. ताज हॉटेलमध्ये पती सदानंद सुळे व सायरस मिस्त्री जेवायला गेले असता तिथल्या कर्मचाऱ्यांना वाटलं सदानंद हेच सायरस आहेत. ते जेव्हा म्हणाले आम्ही तुमच्या स्वागताला आलोय, तेव्हा आम्ही सांगितलं हे सदानंद आहेत व तो सायरस आहेत. इतका लो प्रोफाइल व साधा माणूस होता तो. पाणी पुरी, साबुदाणा खिचडी करा असं सांगून आमच्या घरी हक्कानं ते येत असत असं सांगताना सायरस यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर विश्वासच बसत नसल्याचे सुप्रिया म्हणाल्या.
Devastating News My Brother Cyrus Mistry passed away. Can't believe it.
— Supriya Sule (@supriya_sule) September 4, 2022
Rest in Peace Cyrus. pic.twitter.com/YEz7VDkWCY
२०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हटवलं होतं
शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार असलेले मिस्त्री यांचा ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१२ साली त्यांनी टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. पुढे फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील अन्य कंपन्यांवरून काढून टाकण्यात आलं होतं.
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला होता. जुलै २०१८ मध्ये न्यायाधिकरणाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आणि टाटा समूहातील कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्याकडून गैरव्यवस्थापन आणि दुराचार झाल्याचा त्यांनी याचिकेत केलेल्या आरोपातही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती.
न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय अपील न्यायाधिकरणाने जुलैमध्ये दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण केले आणि १८ डिसेंबरला अंतिम निकाल दिला. रतन टाटा यांचे मिस्त्री यांच्याशी वर्तन अन्यायकारक होते, असंही न्यायाधिकरणाने निकालात नमूद केलं होतं. टाटा सन्सचे सार्वजनिक कंपनी ते खासगी मर्यादित कंपनीत रूपांतरणही बेकायदेशीर ठरविताना, तिला पुन्हा सार्वजनिक कंपनीचे मूळ रूप प्रदान केले जावे, असे अपील न्यायाधिकरणाने आदेशात म्हटलं होतं.