उद्यावर आलेल्या गणेशोत्सवाचा नेहमीप्रमाणे उत्साह दिसत नसला, तरी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत फुलांची आरास करून करण्याचा भक्तांचा प्रयत्न आहे. यामुळे वर्षभर ओस पडलेला कल्याण एपीएमसी मधील फुल बाजार यंदाच्या वर्षात प्रथमच गजबजला आहे. काल रात्री पासूनच विविध रंगाच्या प्रकारच्या फुलांनी फुल बाजार सजला असून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने बाजारात झुंबड उडाल्याचे चित्र आहे.
मंदिरे बंद असल्याने फुलांची मागणी घटल्याने वर्षभर डबघाईला आलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना गणेशोत्सवाने काहीसा दिलासा मिळाला आहे. फुलांची मागणी वाढल्याने फुलांचे दर देखील वधारले असून व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे.
मात्र खरेदीसाठी गर्दी करताना नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करत उत्सव साजरा करण्याची गरज आहे.