कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीची नाही- भास्कर जाधव
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी कोरोनाची टेस्ट सक्तीची करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. पण आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मात्र अशी कोणतीही सक्ती नसल्याचे सांगितले आहे. एवढेच कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना काही अडचण आल्यास मला संपर्क करा, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोविड टेस्टची सक्ती नाहीये आणि येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही सक्ती न करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले आहे. मुंबईत कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कोकणात येणारा भाविक हा मुंबईतला असल्यामुळे मुंबईकरांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला आहे.