कोरोनाच्या संकटात मान्सूनचे शुभ वर्तमान

जग आणि राज्य कोरोनाच्या संकटाची लढत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला भारतीय मान्सून मात्र सर्व देशवासियांसाठी शुभवर्तमान घेऊन आला आहे.'सॅस्कॉफ' संस्थेने यंदा भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Update: 2021-05-03 12:34 GMT

भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये सर्वसामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात सरासरीच्या वर पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पुर्वानुमान 'साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम'तर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आले आहे.

येत्या हंगामातील (२०२१) अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची एकोणवीसावी दोन दिवसीय बैठक २६ ते २८ एप्रिल कालावधीत झाली. जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी प्रमाणे यंदाही बैठक 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'च्या माध्यमातून घेण्यात झाली.

भारतासह, अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांसह जागतिक हवामान संघटनेबरोबरच इतरही आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान मॉडेलचा अभ्यास करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे.

'सॅस्कॉफ'ने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार करता दक्षिण अशियाच्या वायव्य भागासह, हिमालयाचा पायथा, इशान्य भाग, आणि मध्य अशियाच्या अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकेल. तर अफगाणिस्तान, पश्चिम पाकिस्तानसह अतिवायव्य भाग आणि पूर्व भारतातील राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे पुर्वानुमान 'साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त केले आहे.

प्रशांत महासागरात सध्या 'ला-निना' स्थिती निवळत असून, सर्वसाधारण एल निनो स्थिती निर्माण होत आहेत. मॉन्सून हंगामात महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान काहीसे उष्ण राहण्याचे संकेत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. प्रशांत महासागरातील एल-निनो स्थितीसह इंडियन ओशन डायपोल, उत्तर गोलार्धातील उन्हाळा आणि हिवाळ्यातील बर्फाचे आच्छादन, जमीनीचे तापमान आदी प्रादेशिक आणि जागतिक घटकांचा मॉन्सून क्षेत्रातील पावसावर परिणाम याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.

प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागाच्या स्थितीबरोबरच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरकाचाही (इंडियन ओशन डायपोल -आयओडी) मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होतो. सध्या आयओडी स्थिती सर्वसाधारण आहे. तर मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार असून, काही मॉडेलच्या आधारे सौम्य नकारात्मक होण्याची शक्यता आहे. सकारात्मक आयओडी स्थितीमुळे दक्षिण आशियात सरासरीपेक्षा अधिक, तर नकारात्मक आयओडी स्थितीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, असे संकेत आहेत.

उत्तर गोलार्ध आणि युरेशियात डिसेंबर ते मार्च महिन्याच्या कालावधीत बर्फाचे अच्छादन सरसरीपेक्षा कमी होते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ते खुपच कमी होते. युरेशियातील हिवाळा व उन्हाळ्यातील बर्फाचे प्रमाण व दक्षिण आशियातील मॉन्सून यांच्यात परस्परविरोधी संबंध असतो, असही नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

'सॅस्कॉफ'मार्फत पावसाच्या अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार बहुतांश महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे. संपुर्ण देशाचा विचार करता यंदा मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानात सरासरीवर पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. तर पश्‍चिम बंगाल, बिहार, जम्मूकाश्‍मिर मधील उत्तर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

Tags:    

Similar News