राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील सहा विभागात पदयात्रा काढण्यात येणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचे नेतृत्व मी करणार आहे, अमरावती विभागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्र विभागात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मुंबईत माजी मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. कोकण विभागात सर्व नेते एकत्र येऊन पदयात्रा काढतील. या पदयात्रेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. ही पदयात्रा झाल्यानंतर बसयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. भाजपा सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. शेतकरी, कामगार, गरिब, कष्टकरी जनता, तरुणवर्ग, महिलांचे प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर केंद्र व राज्यातील भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. भाजपा जाती धर्मात भांडणे लावून राजकीय पोळी भाजत आहेत. जनतेला वाऱ्यावर सोडून आपल्या मित्रोंसाठी भाजपा सरकार काम करत आहे. यात्रेवेळी सभांच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे जनतेच्या समोर मांडले जाणार आहेत.
लोकसभा मतदारसंघांचा आढावा...
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी निरिक्षकांची नियुक्त करण्यात आले आहेत. हे निरिक्षक ४८ मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतील, तेथील राजकीय परिस्थिती, पक्ष संघटनेची ताकद या सर्वांचा अभ्यास करून १५ ऑगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करतील व त्यानंतर या अहवालावर चर्चा केली जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
राहुल गांधींचा मुंबईत भव्य सत्कार करणार..
राहुल गांधी यांच्या शिक्षेला मा. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने काँग्रेस पक्ष व कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह संचारलेला आहे. राहुल गांधी हे न डगमगता केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करत असतात म्हणूनच भाजपाने षडयंत्र रचून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न केला. देशातील हुकूमशाही सरकार विरोधात लढणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा झालेली आहे. राहुल गांधी यांचा मुंबईत भव्य सत्कार करण्याचा प्रदेश काँग्रेसचा विचार असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी मंत्री नसीम खान यांनी यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांच्याशी दिल्लीत चर्चा केली आहे. प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांना सत्काराचे निमंत्रण दिले आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रवक्ते, डॉ. राजू वाघमारे, भरतसिंग आदी उपस्थित होते.